वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:54 AM2024-10-28T06:54:06+5:302024-10-28T06:57:24+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : शुक्रवारी रात्री झालेल्या ठिय्या आंदोलन प्रकरणी डॉ. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : संगमनेर/अहिल्यानगर : धांदरफळ बुद्रुक येथे डॉ. सुजय विखे-पाटील यांच्या युवक मेळाव्यात डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे विखे समर्थक वसंत देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सकाळी पुणे येथील एका फ्लॅटमधून ताब्यात घेतले. दुसरीकडे, वक्तव्याच्या निषेधार्थ तालुका पोलिस ठाण्याबाहेर शुक्रवारी रात्री झालेल्या ठिय्या आंदोलन प्रकरणी डॉ. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनापरवाना धरणे व जोडे मारो आंदोलन करून त्यात असंविधानिक शब्दोच्चार, तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चालू असलेल्या आदर्श आचारसंहिता व जिल्हाधिकारी, अहिल्यानगर यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले आहे, असे तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस हेड कॉन्स्टेबल संदीप आघाडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. बीएनएस कलम २२३, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३१(१)(३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटल्यानंतर वसंत देशमुखांविरोधात संगमनेर पोलिसात भारतीय न्यायसंहितेचे कलम १९२, ७९ नुसार गुन्हा दाखल झाला होता, तेव्हापासून ते फरार होते. पोलिसांनी त्यांना सध्या अहिल्यानगरमध्येच ताब्यात ठेवले आहे.
‘बदनामी माझी, गुन्हाही माझ्यावरच’
माझी बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल केला आहे. गाड्या जाळल्या, वाहने तोडली. ती नव्याने घेता येतील, मात्र महिलांची गेलेली इज्जत परत येईल का?, हा कसला न्याय?, असा सवाल युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केली. गुन्हा दाखल केल्यानंतर थोरात यांच्यासह युवती, महिलांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यावर रविवारी मोर्चा काढला.
वसंत देशमुख आमचे नाही, काँग्रेसचे कार्यकर्ते : विखे पाटील
आक्षेपार्ह वक्तव्य करणारे वसंत देशमुख हे जरी आमच्या सभेचे अध्यक्ष होते तरी ते आमचे कार्यकर्ते नाहीत. ते काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, असा दावा करत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकारात अंग झटकले आहे. देशमुख हे काँग्रेसमध्ये आहेत. त्यामुळे ते असे का बोलले? याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे, असे विखे म्हणाले. देशमुख काँग्रेसचे कार्यकर्ते असतील तर सुजय विखे यांनी त्यांना सभेचे अध्यक्ष कसे केले? असा प्रश्न केला असता विखे म्हणाले, ‘ते आमच्या सभेचे अध्यक्ष होते, याचा अर्थ ते आमचे झाले असा होत नाही’.