बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:37 PM2024-11-16T13:37:54+5:302024-11-16T13:38:55+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री दिवंगत बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
शिर्डी - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री दिवंगत बी. जे. खताळ-पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियंका गांधी या शनिवारी (दि. १६) अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची नगर-मनमाड महामार्गावर राहाता तालुक्यातील साकुरी येथील दौलतबाग येथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत आहे, यावेळी त्यांनी प्रवेश केला.
काँग्रेसची विजय निर्धार सभा होत असून शिर्डी लोकसभेच्या निरीक्षक, राजस्थानच्या आमदार रिटा चौधरी यांच्या उपस्थितीत विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आंबेडकरी चळवळीचे नेते बाळासाहेब गायकवाड, काँग्रेसचे संगमनेर तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे संगमनेरात आल्यानंतर त्यावेळी विक्रमसिंह खताळ-पाटील हे त्यांच्यासमवेत दिसायचे. विखे-पाटील यांच्या सभांना त्यांची उपस्थितीत असायची. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढविण्यासाठी ते इच्छूक होते.