Vidhan Sabha Election ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील इतर जिल्ह्यांप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदान करताना अनेकजण फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. परंतु जिल्हा निवडणूक शाखेने अशा फोटो काढणाऱ्यांचा बंदोबस्त करणार असून, मतदान केंद्रांच्या २०० मीटर परिसरात मोबाइल बाळगण्यास मनाई असल्याने कोणीही मतदान केंद्रामध्ये मोबाइल बाळगू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात मतदान होणार असल्याच्या ठिकाणापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारण्यास बंदी राहील. तसेच मोबाइल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्षेपके व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. निवडणूक निरीक्षक, जिल्हा निवडणूक अधिकारी, निवडणूक कामकाजाकरिता नेमणुकीस असलेले मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी व मतदार यांचे व्यतिरिक्त इतर व्यक्तीस प्रवेशाकरिता प्रतिबंध करण्यात आला आहे.
या परिसरात खासगी वाहन आणण्यास किंवा संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन करण्यासही मनाई करण्यात आली आहे. हा आदेश दि. २० नोव्हेंबर रोजी मतदान सुरू झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहणार आहे.