लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानंतर भाजपचे कार्यकर्ते श्रीरामपूर राहुरी मतदारसंघात महायुतीतीलराष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. मंगळवारी रात्री विखे पाटील यांनी लोणी येथे बैठक घेऊन पक्ष कार्यकर्त्यांना कानडे यांच्या प्रचारात उतरण्याचे आदेश दिले.
लोणी येथील बैठकीस भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, माजी जि.प. सदस्य शरद नवले, विराज भोसले, गणेश मुदगुले, प्रताप शेटे, ज्येष्ठ नेते नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, नितीन भागडे, गिरीधर आसने आदी उपस्थित होते. यावेळी विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांची मते आजमावली. त्यावेळी सर्वांनीच कानडे यांचा प्रचार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यास विखे पाटील यांनी संमती दिली.
बुधवारी सकाळी विखे पाटील यांच्या श्रीरामपूर शहरातील संपर्क कार्यालयास आमदार कानडे यांनी भेट दिली. तेथे दीपक पटारे यांनी त्यांचे स्वागत केले. भाजपचे नेते नितीन दिनकर, माजी नगरसेवक रवी पाटील, गणेश राठी यावेळी उपस्थित होते. शुक्रवारी शहरात विखे पाटील यांच्या उपस्थितीत कानडे यांच्या प्रचारास प्रारंभ होत आहे. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेदवार कानडे हे असल्याचे निश्चित झाले आहे.
अनेकांचा पक्ष प्रवेश
आमदार लहू कानडे यांची कामाची शैली व विकासाभिमुख राजकारणाला प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष रवींद्र गुलाटी यांनी दिली. त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक अशोक कानडे, अंकुश कानडे, अमृत धुमाळ, राजेंद्र चौधरी, राजेश अलघ, मोहम्मद शेख, सलीम शेख, महाराज कंत्रोड, अनिल गुप्ता, कमालपूर गुरुद्वाराचे ट्रस्टी भगवंत सिंग बत्रा, प्रशांत अलघ, सचिन गुलाटी, नीरज त्रिपाठी, गणेश वर्मा, राकेश सहानी, बंटी थापर, चेतन जग्गी, प्रदीप गुप्ता, नामदेव अस्वार, नासिर शेख, गणेश गायकवाड, मदन कणघरे, सुनील परदेशी, रोहित गुलदगड, प्रशांत यादव, अशोक गायकवाड आदींनी प्रवेश केला. बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला.