लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर/कोल्हार: विधानसभा निवडणुकीत शिर्डी आणि संगमनेर हे दोन्ही मतदारसंघ महाराष्ट्राचे केंद्रबिंदू बनले आहेत. संगमनेर तालुक्यात दहशत असल्याचा, विकास न झाल्याचा आरोप केला जातो. विधानसभा निवडणुकीत संगमनेर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांत आता जनताच न्यायाधीश होईल. या दोन्ही तालुक्यांतील विकासकामांची जनतेने तुलना करावी. दहशत नेमकी कोणत्या तालुक्यात आहे, याचाही फैसला करावा, असे आवाहन काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
शिर्डी विधानसभेतील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती जनार्दन घोगरे यांनी सोमवारी (दि. २८) काँग्रेस पक्षाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी लोणी खुर्द येथे विजय संकल्प मेळावा झाला. यावेळी आमदार थोरात बोलत होते. व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार नीलेश लंके, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, राजेंद्र बावके, नारायण कार्ले, विजय दंडवते, विक्रांत दंडवते, सचिन चौगुले, लता डांगे, शीतल लहारे, सुधीर म्हस्के, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रशांत शेळके, विठ्ठल घोरपडे, राजेंद्र फाळके, सुरेंद्र खर्ड आदी यावेळी उपस्थित होते.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता आमदार थोरात म्हणाले की, त्यांना दोनदा जिल्हा परिषदेच्या, जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी दिली. मात्र, ते विसरून गेले. संगमनेर तालुक्यात दहशतीचे एक तरी उदाहरण दाखवा, निळवंडे धरणाचे पाणी मी आणले. तुम्ही फक्त सोडण्याचे काम केले. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना निळवंडे धरणाचे पाणी सोडायलाही तुम्ही नेले नाही. निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज तुम्हीच केला. पक्ष बदलला की, त्यांचे तत्त्वज्ञान बदलते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. त्यांनी ६० वर्षांमध्ये कोणताही मोठा प्रकल्प आणला नाही. केवळ विकासाला खोडा घातला.
मी कनोली-मनोलीतच नव्हे, राज्यभर फिरतो : थोरात
त्यांच्यासारखे माझे कनोली, मनोली, कनकापूर, दाड, चणेगाव, हसनापूर असे नाही. मला राज्यभर फिरावे लागते, असा टोलाही आमदार थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.
जया रडली नाही तर लढली
धांदरफळ येथील सभेचा थोरात यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, टायगर अभी जिंदा है, असे तुम्ही सांगतात. तुम्ही मर्द होते तर कार्यकर्त्यांना मागे सोडून पळाले कशाला? अकोले, ठाणगाव समृद्धीमार्गे शिर्डीला पळाले. जयश्री थोरात या रडल्या नाही तर लढल्या. ती स्वातंत्र्यसैनिकांच्या घरातील आहे. जे तुम्ही पाहिले ती झलक आहे. संगमनेर तालुका हा विचारांचा, चळवळीचा तालुका आहे. या तालुक्याच्या नादाला लागू नका, असा थेट इशाराही आमदार थोरात यांनी दिला.
देशमुखांच्या गळ्यात विखेंचा पट्टा
वसंत देशमुख हे काँग्रेसचे आहेत, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना सांगितले. त्यावर थोरात आपल्या भाषणात म्हणाले, भाषण करताना देशमुख यांच्या गळ्यात भाजपचा पट्टा होता. त्याहीपेक्षा त्यांच्या गळ्यात विखेंचा पट्टा आहे. भाजप हे त्यांच्यासाठी दुय्यम आहे. जिकडे विस्खे, तिकडे देशमुख, असाच त्यांचा आयुष्यभर कार्यक्रम राहिला आहे.
प्रभावती घोगरे प्रवरेची वाघीण: लंके
प्रभावती घोगरे या प्रवरेची वाघीण असून त्या विधिमंडळात जाणार आहेत. दहशत फार काळ टिकत नाही. अती तेथे माती होते. गणेश सहकारी साखर कारखान्यापासून हीच दहशत मोडून काढायला सुरुवात झाली. नगर दक्षिण मतदारसंघातील दहशत मोडीत काढली. जगन्नाथाचा रथ आता पुन्हा शिर्डी विधानसभा मतदारसंघात आला आहे. आम्ही हात जोडतो. वेळ आली तर बाह्यादेखील वर करतो, असा इशारा खासदार लंके यांनी दिला.