साईबाबांनी समानता शिकवली; तो विचार राजकारणातून गायब: प्रियंका गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2024 12:44 PM2024-11-17T12:44:50+5:302024-11-17T12:45:54+5:30
शिर्डीत साईदर्शन; साईबाबांच्या विचारांचे स्मरण.
लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी :शिर्डीच्या पवित्र भूमीत येऊन मला समाधान वाटले. साईबाबांनी समानता व मानवतेची शिकवण दिली. त्यांचा हा विचार आज राजकीय मंचावर जपला जात आहे का? हा प्रश्न आहे. सभांतील भाषणांत आज खरेपणा राहिलेला नाही. सर्रास खोटे बोलले जात आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले.
त्यांची जिल्ह्यातील आजवरची ही पहिलीच सभा होती. यावेळी त्यांनी साईसमाधीचेही दर्शन घेतले. विमानतळावर आगमन झाल्यानंतर गांधी साईमंदिरात गेल्या. तेथे दर्शन घेऊन त्या सभास्थानी आल्या. मंदिरात मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला. सभेत त्यांनी पस्तीस मिनिटे भाषण केले.
त्या म्हणाल्या, मंदिरात जाऊन आपण दर्शन घेतो; पण मंदिरातील विचार आपण व्यवहारात मात्र जपत नाही. संत गाडेगाबाबांनीही आपणाला 'मनात डोकवा. मनातील दुर्गंधी साफ करा,' हा संदेश दिला होता. या जिल्ह्याच्या भूमीतून स्वातंत्र्याची लढाई लढली गेली. महाराष्ट्रात तंट्या भिल्ल, उमाजी नाईक, राघोजी भांगरे, राणी दुर्गावती हे क्रांतिकारक निर्माण झाले. या भूमीतून टिळक, आगरकर, काका कालेलकर, विनोबा भावे, अच्युतराव पटवर्धन, भाऊसाहेब थोरात, अण्णासाहेब शिंदे यांनी समाजसुधारणेचे विचार मांडले, असाही उल्लेख त्यांनी केला.
शिर्डीत दहशत आहे असे लोक म्हणतात. मात्र न घाबरता मतदान करा, असेही त्या शेवटी म्हणाल्या. जयश्री थोरात यांनी स्वागत केले. नामदेव कहांडाळ यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेनेचे रावसाहेब खेवरे यांनी आभार मानले. व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसच्या निरीक्षक आमदार रिटा चौधरी, तेलंगणा राज्यातील मंत्री सीताक्का, बाळासाहेब गायकवाड, करण ससाणे, मिलिंद कानवडे, अॅड. नारायण कार्ले, किरण काळे आदी उपस्थित होते. दिवंगत बी. जे. खताळ पाटील यांचे नातू विक्रमसिंह खताळ-पाटील यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
भाजपकडून महिलांचा अवमान : थोरात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पाशा पटेल, महाडिक यांच्या भाषणांवर टीका केली. ते म्हणाले, 'भाजपचे नेते महिलांबद्दल सतत आक्षेपार्ह व अवमानकारक बोलत आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत संगमनेरात दहशत असल्याचे सांगितले. आता माध्यमांनीच नेमकी संगमनेर की राहाता तालुक्यात दहशत आहे याचे सर्वेक्षण करावे. तसेच विकास कोणत्या तालुक्यात अधिक झाला आहे? याचीही तपासणी करावी, असे आवाहन थोरात यांनी केले.
किसान की बेटी, शिक्षकाचा मुलगा
शिर्डीतील उमेदवार प्रभावती घोगरे यावेळी बोलताना म्हणाल्या, 'देश की बेटी किसान के बेटी के लिए मिलने शिर्डी आयी है...!' कोपरगावचे उमेदवार संदीप वर्षे म्हणाले, मी सामान्य शिक्षकाचा मुलगा आहे.
थोरातांना संधी द्या : हेमंत ओगले
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर थोरात यांना संधी दिली जावी, अशी मागणी सभेत श्रीरामपूरचे उमेदवार हेमंत ओगले यांनी केली.