लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : सुमारे ४० वर्षांपूर्वी दुष्काळी असलेला संगमनेर तालुका आता राज्यात सर्वाधिक प्रगत तालुका म्हणून ओळखला जातो. असे प्रतिपादन नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी केले.
आमदार तांबे यांनी संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी, राजापूर येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सीताराम राऊत, पंचायत समितीचे माजी सभापती नवनाथ अरगडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार तांबे म्हणाले, अनेक लाटा आल्या आणि गेल्या. मात्र, संगमनेर तालुक्यातील जनता आमदार बाळासाहेब थोरात यांच्याच पाठीशी उभी आहे. संगमनेर तालुक्यावर आलेल्या प्रत्येक संकटाच्यावेळी आमदार थोरात हे जनतेच्या मदतीला उभे राहिले. मग ते कोरोनाचे संकट असो अथवा पूर परिस्थिती असेल, अशा सगळ्याच परिस्थितीमध्ये आमदार थोरात कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावत होते, संपूर्ण संगमनेर तालुक्याला आमदार थोरात यांनी विकासातून वैभवाकडे नेले. १७१ गावे, २५८ वाड्यावस्त्या असलेला संगमनेर तालुका ११० किलोमीटर लांबीचा असून येथे सातत्याने विकासकामे सुरू असतात. सहकार, शिक्षण, शेती, ग्रामीण विकास यामाध्यमातून तालुक्यात आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे, असे तांबे म्हणाले.
बाह्य शक्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला
बाह्य शक्त्तीने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. परंतु खालच्या पातळीवर जेव्हा टीका झाली, तेव्हा संगमनेर तालुक्यातील नागरिक एकवटले आणि तालुक्याची अस्मिता जागी झाली. विधानसभा निवडणुकीतून संगमनेर तालुक्यातून विक्रमी मताधिक्याचे मापदंड निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने काम करावे. बाह्यशक्त्तीसह अनेकांनी तालुक्याच्या अस्मितेला डिवचण्याचा जेव्हा प्रयत्न केला. तेव्हा तालुका एकवटला आहे, असेही आमदार तांबे म्हणाले.