शरद झावरे, लोकमत न्यूज नेटवर्क, पारनेर : पारनेर विधानसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. २९) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी २१ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले. यावेळी ११ अपक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या पिपाणी (Trumpet) चिन्हाची मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस असे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पिपाणी चिन्ह घेतलेल्या उमेदवाराला ४५ हजारांहून अधिक मते मिळाली होती. त्यापैकी पारनेर विधानसभा मतदारसंघातून पिपाणी चिन्हावर उभे असलेल्या उमेदवाराला जवळपास १७ हजार मते मिळाली होती. आता विधानसभा निवडणुकीतही राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हासारखे साधर्म्य असलेल्या पिपाणी चिन्हाची ११ अपक्षांनी मागणी केली.
पिपाणी चिन्हामुळे राज्यभर मतांची विभागणी झाल्याचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा दावा आहे. त्यामुळे त्यांनी निवडणूक आयोगाकडे हे चिन्ह गोठविण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठविले नाही. याबरोबरच ऑटो रिक्षा, नारळ, गॅस सिलिंडर, शिट्टी, अंगठी, प्रेशर कुकर, शिलाई मशीन या चिन्हांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. ज्ञानदेव कोंडिबा जगताप, किसन मारुती पठारे, रवींद्र विनायक पारधे, संदेश तुकाराम कार्ले, विजय सदाशिव औटी, सुजित वसंतराव पाटील, सखाराम मालू सरक, भाऊसाहेब बाबाजी जगदाळे, ज्ञानेश्वर संजय भोगाडे, अॅड. सचिन एकनाथ कोकाटे, प्रवीण सुभाष दळवी या अपक्षांनी पिपाणीला चिन्हासाठी प्रथम पसंती दिली आहे.