लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीगोंदा : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात भाजपचे विक्रमसिंह पाचपुते, उद्धवसेनेच्या अनुराधा नागवडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बंडखोर राहुल जगताप, वंचित बहुजन आघाडीचे अण्णासाहेब शेलार यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. तसेच भाजपच्या सुवर्णा पाचपुते यांनीही बंडाचे निशाण हाती घेतले आहे. आता १६ उमेदवार रिंगणात उरले आहेत, तर 'प्रहार'चे घनश्याम शेलार, प्रतिभा पाचपुते, राजेंद्र नागवडे, टिळक भोस आदी १५ उमेदवारांनी माघार घेतली. दिवसभर अनेक घडामोडी घडल्या.
भाजपने प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र श्रीगोंद्यातील भाजप कार्यकर्त्यांनी विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी द्या, असा आग्रह धरला. अखेर प्रतिभा पाचपुते यांच्या ऐवजी विक्रमसिंह पाचपुते यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली, असा फोन भाजप प्रदेश कार्यालयातून २:५० वाजता आला. त्यानंतर प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
विक्रमसिंह पाचपुते यांच्या उमेदवारीवर त्यानंतर शिक्कामोर्तब झाले. राजेंद्र नागवडे, पृथ्वीराज नागवडे, अनंता पवार, नीलेश नवले, अरविंद कारंजकर, पांडुरंग खेतमाळीस, प्रणोती जगताप, ऋषीकेश शेलार, वंदना इथापे, टिळक भोस, श्रीनिवास नाईक, अजित भोसले, प्रतिभा पाचपुते, घनश्याम शेलार, नीलेश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.
थोरात धावले नागवडे यांच्या मदतीला...
घनश्याम शेलार यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावे यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, अरुण म्हस्के यांना श्रीगोंद्यात पाठविले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी आमदार बाळासाहेब थोरात व घनश्याम शेलार यांच्यात २९ सेकंदाचा संवाद घडवून आणला. थोरात म्हणाले, घनशामअण्णा तुम्हाला मागील विधानसभा निवडणुकीत ९८ हजार मते मिळाली, पण आता परिस्थिती अवघड आहे. तुम्ही माघार घ्या. पक्ष तुम्हाला मोठी संधी देईल. दरम्यानच्या काळात राजेंद्र नागवडे यांनीही घनश्याम शेलार यांना विनंती केली. त्यानंतर घनश्याम शेलार यांनी माघार घेतली.
...अन् प्रहारचा बोर्ड हटविला
घनश्याम शेलार यांनी उमेदवारी अर्ज मागे घेताच शेलार यांच्या समर्थकांनी त्यांच्या श्रीगोंदा येथील जनसंपर्क कार्यालयावरील प्रहार पक्षाचा लावलेला फलक काढून टाकला.
राहुल जगताप झाले गायब...
राजेंद्र नागवडे यांचे बंधू दीपक नागवडे हे उमेदवारी अर्ज मागे घ्यावी, अशी विनंती करण्यासाठी येणार आहेत याची चाहूल लागताच राहुल जगताप हे पिंपळगाव पिसा येथील निवासस्थानामधून काही वेळ गायब झाले होते. अखेर दीपक नागवडे हे डॉ. प्रणोती जगताप यांना विनंती करून निघून गेले.