लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत : पहिल्यांदा मी आमदार म्हणून काम केले. दुसऱ्या टर्मपासून राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि चौथ्या वेळेस राज्याचा मुख्यमंत्री झालो. तीच परिस्थिती रोहित पवारांसाठी देखील आहे. आता दुसऱ्या वेळेस रोहितला तुम्ही विक्रमी मतांनी निवडून दिल्यास पुढे त्याला काय द्यायचे ते माझ्यावर सोपवा. पहिल्या पाच वर्षांत चांगले काम केले आहे. आता तुमच्या मनातला मतदारसंघ तो नक्की घडवेल, असा विश्वास आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी येथे रविवारी आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार रोहित पवार, भूषणसिंह राजे होळकर, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, लोकसभेत मतदारांनी चारशे पारचा नारा खोडून काढला. संविधान बदलण्यासाठी यांना चारशे खासदार हवे होते. सर्वसामान्यांना जगण्याचा अधिकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिला आहे. घटना न बदलण्यासाठी आम्ही दिल्लीत काम करतोय आणि हा अधिकार तुम्ही निवडून दिलेले खासदार उत्तम करीत आहे. विधानसभेत देखील हा चमत्कार मतदारांनी करावा.
रोहित पवार म्हणाले, मला संघर्ष करण्याची खरी ताकद कर्जत- जामखेडच्या मतदारांमुळे मिळाली. भाजपने पक्ष फोडला, तरी हार नाही मानत. पवार साहेबांनी नवा पक्ष उभारत आपल्या सर्व माणसांना ताकद दिली. कर्जत एसटी बस आगार, शैक्षणिक, आरोग्य यासह सर्व प्रश्नांवर मतदार केंद्रबिंदू ठेवत विकासाचे काम केले.