लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : महाराष्ट्राला दिवंगत यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख अशा समृद्ध नेत्यांची परंपरा आहे. ही परंपरा आमदार बाळासाहेब थोरात यांनी जोपासली आहे. लातूरच्या जनतेने आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर कायम प्रेम केले. महाराष्ट्राचा नेता म्हणून आता त्यांची ओळख झाली आहे. दुष्काळग्रस्त तालुक्याचा सततच्या कामातून त्यांनी विकासातून मोठा कायापालट केला. हा तालुका राज्यात पोहोचवला आहे, अशी भावना माजी मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
सोमवारी तालुक्यातील तळेगाव दिघे येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित युवा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार अमित देशमुख, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, आंबेडकरी चळवळीचे नेते बाळासाहेब गायकवाड, उद्धव सेनेचे अमर कतारी आदी उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, आमदार बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत, स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व आहे. त्यांनी सततच्या विकास कामातून तालुक्याचा कायापालट केला.