लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर :श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अर्ज माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे रविवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून कांबळे यांची अर्ज माघारीसाठी शोधाशोध मोहीम सुरू होती. मात्र, त्यांना यश आले नाही. त्यामुळे महायुतीकडून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार लहू कानडे व कांबळे या दोघांचेही अर्ज राहिले.
खासदार सदाशिव लोखंडे व त्यांचे पूत्र प्रशांत या दोघांनीही अपक्ष अर्ज माघे घेतले. मतदारसंघात १२ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निवडणूक रिंगणात १६ उमेदवार उतरले आहेत. उमेदवारांमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे लहू कानडे, शिवसेना शिंदे गटाचे भाऊसाहेब कांबळे, काँग्रेसचे हेमंत ओगले, मनसेकडून राजाभाऊ कापसे, वंचित आघाडीकडून अण्णासाहेब मोहन, तिसऱ्या आघाडीकडून जितेंद्र तोरणे यांचा समावेश आहे. माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी समर्थकांचा मेळावा घेतला. त्यानंतर प्रशांत यांच्यासह त्यांनी अर्ज मागे घेतला.
महायुतीकडून आमदार लहू कानडे यांचा अर्ज कायम राहून कांबळे माघार घेतील, अशी चर्चा होती. स्वतः पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक यांच्यात रविवारी गप्पांची मैफल रंगली. त्यानंतर तसे संकेत मिळाले होते. मात्र रविवारी संध्याकाळी कांबळे हे नॉटरिचेबल झाले. सोमवारी वाऱ्यासारखी बातमी मतदारसंघात पसरली. विखे यांच्या जवळचे कार्यकर्ते कांबळे यांच्या शोधासाठी रवाना झाले. त्यामुळे कांबळे यांची माघार होणार का? याकडे अर्ज माघारीची वेळ संपेपर्यंत लक्ष लागले होते. मात्र कांबळे यांचा संपर्क होऊ शकला नाही. अखेर संध्याकाळी त्यांचा मोबाईल सुरू झाला.
माजी खासदार सदाशिव लोखंडे, प्रशांत लोखंडे, संतोष कांबळे, संजय छत्तीसे, चेतना बनकर, प्रकाश संसारे, श्यामशंकर कानडे, अशोक बागुल, सुभाष त्रिभुवन, दीपक त्रिभुवन, विजय खाजेकर, संदीप मगर यांनी माघार घेतली.
मुख्यमंत्री कार्यालय तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाऊसाहेब कांबळे यांना अर्ज माघारीचे आदेश दिले होते. मुख्यमंत्री कार्यालय त्यासाठी संपर्कात होते. मात्र कांबळेंनी आदेश धुडकावले व उमेदवारी केली. महायुतीकडून अधिकृत उमेदवार आपणच आहोत. - आमदार लहू कानडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार
माझ्या उमेदवारी अर्ज माघारीसाठी स्थानिकांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, मी ते मानले नाहीत. माझा मोबाइल नॉटरिचेबल होण्याचे काहीच कारण नाही. रात्रभर प्रवासात होतो. त्यामुळे मोबाइल फोन डिस्चार्ज झालेला होता. - भाऊसाहेब कांबळे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार