लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर: श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघात महायुतीतील राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून आमदार लहू कानडे यांचे अधिकृत उमेदवारी यादीत नाव सोमवारी जाहीर झाले आहे. दुसरीकडे शिंदेसेनेचे उमेदवार माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आदेश न मानता उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे कांबळे यांच्या बंडखोरीवर पक्षाकडून कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे उमेदवार लहू कानडे यांनी मंगळवारपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. डावखर रस्त्यावरील काँग्रेस भवन येथून राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक व शिवाजी रस्त्यावर माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी कानडे यांच्यासाठी प्रचार कार्यालय उभारले आहे. महायुतीने अधिकृतपणे कानडे यांना उमदेवारी जाहीर केली आहे.
नेवासे मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवारी अर्ज होता. अविनाश आदिक यांच्या प्रयत्नातून तो अर्ज सोमवारी मागे घेण्यात आला. श्रीरामपुरात शिंदेसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या अर्जमाघारीची जबाबदारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे होती. मात्र कांबळे हे नॉट रिचेबल झाले.
दिवसभर त्यांचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे कांबळेंची उमेदवारी कायम राहिली. कांबळे यांनी स्वतः निर्णय घेत अर्ज कायम ठेवला. त्यांना कोणाचाही पाठिंबा नाही. कांबळे यांना अर्ज मागे घेण्याबाबत विखे पाटील यांनी आदेश दिला होता.
दरम्यान, कांबळे यांनी विखे पाटील यांचे आदेश डावलले आहेत. श्रीरामपुरात रविवारी सायंकाळी विखे पाटील यांनी त्यांना उमेदवारी माघारीचे आदेश दिले होते. त्यामुळे महायुती व शिंदेसेनेकडून कांबळे यांच्यावर काय कारवाई होणार? याकडे लक्ष लागले आहे. कांबळे यांची उमेदवारी ही महायुतीतील बंडखोरी मानली जात आहे.
घोषणापत्राचे होणार प्रकाशन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तयार केलेल्या घोषणापत्राचे बुधवारी सकाळी साडे अकरा वाजता डावखर रस्त्यावरील काँग्रेस भवन येथे प्रकाशन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व महायुतीचे अधिकृत उमेदवार यांची बैठक घेतली. बैठकीला श्रीरामपूर विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार लहू कानडे उपस्थित होते.