महाविकास आघाडीला १८० पर्यंत जागा मिळतील: बाळासाहेब थोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2024 12:55 PM2024-11-19T12:55:35+5:302024-11-19T12:56:25+5:30
तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी सक्षमपणे सांभाळली
लोकमत न्यूज नेटवर्क, संगमनेर : राज्यात महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. शेतीमालाला, दुधाला भाव नाही. इंधनदरवाढ, ठप्प झालेला विकास यामुळे जनतेच्या मनात महायुतीबद्दल मोठा रोष निर्माण झाला आहे. राज्यातील जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास वाढतो आहे. मोठ्या बहुमताने विजयी होऊन महाविकास आघाडीला १८० पर्यंत जागा मिळाल्या तर आश्चर्य मानायचे कारण नाही असे आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
सोमवारी (दि.१८) आमदार थोरात यांनी त्यांच्या शहरातील सुदर्शन निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्यांच्यासमवेत त्यांच्या कन्या युवक काँग्रेसच्यासंगमनेर तालुकाध्यक्षा डॉ. जयश्री थोरात होत्या. पत्रकारांशी बोलताना आमदार थोरात म्हणाले, मूलभूत प्रश्नांना ते उत्तर देऊ शकत नाही, त्यामुळे आता जातीपातींचं राजकारण करण्याचे काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मी राज्यभर दौरे केले. जनतेच्या मनात महायुती सरकारबद्दल प्रचंड राग दिसून आला. असंविधानिक व भ्रष्टाचारी महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचणे, हे पहिले उद्दिष्ट आहे. राज्यभर प्रचार करीत असताना संगमनेर तालुक्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली असे ते म्हणाले.
राहाता तालुक्यात दहशत, दडपशाही
संगमनेरातून नक्कीच मोठा विजय होणार आहे. जिल्ह्यात सर्व जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. याचबरोबर शेजारी राहता तालुक्यामध्ये प्रचंड दहशत आणि दडपशाही आहे. ३५ वर्षे एकाच घरात सत्ता, खासदार, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी विविध पदे असतानासुद्धा त्यांना राहाता तालुक्याचा विकास करता आला नाही. नगर-मनमाड रस्त्याची मोठी दुरवस्था आहे. साई संस्थानमधील ५९८ कर्मचाऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहेत. शहराचा आराखडा विकसित झालेला नाही. साई संस्थांचे सुसज्ज हॉस्पिटल असताना खासगी २०० बेडचे हॉस्पिटल निर्माण करण्याची गरज काय ?, साई संस्थान मोठे शैक्षणिक संकुल उभे करू शकले असते. मात्र, तेथे ते होऊ दिले जात नाही. संस्थांच्या कारभारामध्ये बेकायदेशीरपणे हस्तक्षेप केला जातो आहे, अशीही टीका आमदार थोरात यांनी केली.