लोकमत न्यूज नेटवर्क, नेवासा : पक्ष फोडून तयार झालेल्या महायुतीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना एकनिष्ठतेचे धडे देणे योग्य नाही. केवळ सत्तेसाठी एकमेकांच्या जागेवर आपापले उमेदवार देत असल्याने जनता हे सहन करणार नाही, अशी टीका तिसऱ्या आघाडीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी केली.
नेवासा येथे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, शहराध्यक्ष रोहित पवार, शिवसेना शहरप्रमुख बाबा कांगुणे, माजी नगरसेवक सुनील वाघ, कार्यकर्ते उपस्थित होते.
कड्डू म्हणाले, बाळासाहेब मुरकुटे यांचा सर्व्हे अनुकूल असताना तसेच कार्य दमदार असतानाही भाजपने त्यांचा घात केला. कार्यकर्त्यांनी एकनिष्ठेने राहावे, मात्र नेत्यांनी निष्ठा विकावी हे सगळं विचित्र राजकारण राज्यात चालू आहे. प्रत्यक्षात निष्ठा या जनतेवर ठेवाव्यात. इथला महायुतीचा उमेदवार सगळे पक्ष फिरून भाजपत आला आणि तिकिटासाठी सेनेत गेला अशी टीका कडू यांनी केली.
बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, मतदारसंघात सातत्याने भाजपचे योगदान आहे. परंतु, लोकसभेला शिवसेना उमेदवाराला दिलेले मताधिक्य ही आमची चूक झाली आहे. त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला. त्यामुळे भाजपाचे अस्तित्व संपले.