लोकमत न्यूज नेटवर्क, कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यातच पुन्हा प्रमुख लढत होणार आहे. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी अखेरच्या टप्प्यात नाराजांचे मन वळविण्यात यश मिळविले. विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे यांनी उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी मागे घेतले. आता एकूण ११ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.
सोमवारी (दि. ४) विधानसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. यात महायुतीकडून विखे समर्थक असणारे अंबादास पिसाळ, मविआकडून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अॅड. कैलास शेवाळे यांच्या भूमिकेकडे मतदारसंघाचे लक्ष लागले होते. दोन्ही भूमिपुत्रांनी माघार घेत आपली भूमिका पक्षासोबत ठेवली आहे. यासह मनसेचे रवींद्र कोठारी, रासपाचे स्वप्निल देसाई, इतर ८ अशा एकूण १२ जणांनी विधानसभा उमेदवारी अर्ज माघारी घेतले. कर्जत-जामखेडसाठी ११ उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले आहेत. यात मुख्य लढत पुन्हा एकदा भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यात रंगणार आहे. आमदार रोहित पवार आपला बालेकिल्ला कायम राखतात की आमदार राम शिंदे त्यांना धोबीपछाड देतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
तीन राम शिंदे, दोन रोहित पवार रिंगणात कायम
यंदा कर्जत-जामखेड मतदारसंघात नावाचे साधर्म्य असणारे भाजपचे प्रा. राम शिंदे यांच्यासह तीन, तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यासह दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत. विशेष म्हणजे आमदार रोहित राजेंद्र पवार यांचे तुतारी चिन्ह असून अपक्ष असणारे रोहित चंद्रकांत पवार यांना ट्रम्पेट चिन्ह मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीत याच ट्रम्पेट चिन्हांनी ४४ हजारांच्या पुढे मतदान मिळविले होते.