लोकमत न्यूज नेटवर्क, नेवासा : आमदार शंकरराव गडाख यांना महायुतीसोबत येण्यासाठी भरपूर प्रलोभने, धमक्या दिल्या गेल्या. सत्तेचा दुरुपयोग करून त्रास दिला, परंतु, ते बधले नाहीत. गडाखांनी खोके नव्हे, डोके मोजून जनतेचा आदर केला आहे, असे प्रतिपादन उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले.
महाविकास आघाडीचेनेवासा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ गुरुवारी दुपारी झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी महसूलमंत्री यशवंतराव गडाख यांची प्रमुख उपस्थित होती.
महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करण्यापर्यंत या लोकांची मजल गेली. नुसत्या वाऱ्याने पुतळा कोसळल्याची शरम महायुतीला वाटत नसल्याची खंत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, अनेक सभा पाहिल्या मात्र आजच्या सभेतील गर्दीचा करंट वेगळाच दिसतो. यावेळी यशवंतराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, उदयन गडाख, अशोक गायकवाड आदींची भाषणे झाली.
विखे असो वा फिके तालुक्याचे नुकसान सहन करणार नाही : गडाख
पालकमंत्री असताना राधाकृष्ण विखे पाटील यांनी नेवासा तालुक्यावर अन्याय केला. लोकसंख्येच्या तुलनेत जिल्हा नियोजन मंडळातून तालुक्यांना निधी दिला जातो. विखे यांनी नेवाशाला त्या प्रमाणात निधी दिला नाही. आमदार म्हणून त्यांनी मला एक रुपयाचाही निधी दिला नाही. हे जे दोन छापा-काटा असलेले दोन भाऊ उभे आहेत. त्यांना निधी दिला. त्यांनी तो कोठे खर्च केला व कोणते ठेकेदार त्यासाठी नेमले याची चर्चा व्हायला हवी. विखे असो वा फिके असो यापुढे तालुक्यावरील अन्याय सहन करणार नाही, असे गडाख म्हणाले. ही लढाई 'राहाता विरुद्ध नेवासा व लोणी विरुद्ध सोनई आहे, असेही ते म्हणाले.
सत्ता गेल्यावर विकास कामांना स्थगिती
शंकरराव गडाख म्हणाले, गत निवडणुकीत जनतेने अपक्ष निवडून दिले. उद्धव ठाकरे यांच्या सरकारला पाठिंबा दिला. मनातही नसताना मला ठाकरे यांनी मंत्रिपद दिले. मंत्रिपदाचा उपयोग तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठी केला. मात्र सत्ता गेल्यानंतर महायुती सरकारच्या काळात नेवासा तालुक्याला निधी दिला गेला नाही. राजकीय हेतूने या सरकारने विकास कामांना स्थगिती लावली. हिंदू-मुस्लिम वाद करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला. मी नेवासा शहरातील हिंदू- मुस्लिमांना एकत्रित करण्याचे काम केले. त्यामुळे एकोपा निर्माण झाल्याचे गडाख यांनी सांगितले.