लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर : गतवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा लढविल्या होत्या. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने सात, तर भाजपने पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. परंतु श्रीरामपूरमध्ये शिंदे सेनेनेही उमेदवार दिला आहे.
मागील विधानसभा निवडणूक आघाडी व युतीने एकत्र लढविली होती. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आठ जागा लढविल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट तयार झाले आहेत. यंदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला जिल्ह्यातील सात जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसने गतवेळी तीन जागा लढविल्या होत्या. याहीवेळी काँग्रेसने तीन जागांवरच उमेदवार दिले आहेत.
शिवसेनेने गतवेळी चार जागा लढविल्या होत्या. शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झाले. उद्धवसेना महाविकास आघाडीसोबत आहे. उद्धवसेनेला यावेळी दोन जागा मिळाल्या आहेत. गतवेळी भाजपने आठ जागा लढविल्या होत्या. यंदा भाजपच्या वाट्याला पाचच जागा आल्या आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. शिंदेसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्ह्यात २८८ इच्छुकांनी ४१५ अर्ज दाखल केले असून सर्वाधिक ३६ जणांनी ५४ अर्ज श्रीगोंदा मतदारसंघातून दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्जाची आज छाननी होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. मागील सात दिवस इच्छुकांकडून उमेदवारी अर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ सुरु होती. अखेर मंगळवारी दुपारी ३ वाजता ही धावपळ शांत झाली. शेवटच्या दिवशी जिल्ह्यातून १७० जणांनी २४१ अर्ज दाखल केले.
जिल्ह्यात एकूण २८८ उमेदवारांनी ४१५ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये अकोले मतदारसंघात १३ जणांनी १६ अर्ज दाखल केले तर संगमनेरात १६ इच्छुकांनी २४ अर्ज, शिर्डीतून १५ जणांनी २५ अर्ज, कोपरगावमधून १९ इच्छुकांनी ३० अर्ज, श्रीरामपूर मतदारसंघात ३१ जणांनी ५१ अर्ज दाखल केले आहेत. नेवासामधून २० जणांनी ३३ अर्ज, शेवगावमधून ३६ इच्छुकांनी ४७ अर्ज, राहुरीत २७ जणांनी ३८ अर्ज, पारनेरमधून २१ इच्छुकांनी २३ अर्ज, नगर शहरातून २७ जणांनी ३७ अर्ज, श्रीगोंदा मतदारसंघातून ३६ जणांनी ५४ अर्ज तर कर्जत-जामखेडमधून २३ इच्छुकांनी ३७ अर्ज दाखल केले आहेत.
२०१९ मध्ये कोणी किती जागा लढविल्या?
राष्ट्रवादी काँग्रेस- अहमदनगर शहर, कोपरगाव, राहुरी, अकोले, शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत- जामखेड, काँग्रेस- संगमनेर, श्रीरामपूर, शिर्डी शिवसेना- अहमदनगर शहर, पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर भाजप- शिर्डी, कोपरगाव, नेवासा, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, अकोले