लोकमत न्यूज नेटवर्क शेवगाव : शेवगाव विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवारांनी माघार घेतल्याने १५ उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामध्ये महायुतीकडून आमदार मोनिका राजळे, महाविकास आघाडीचे अॅड. प्रताप ढाकणे यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, जनशक्ती आघाडीच्या हर्षदा काकडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने बहुरंगी लढत होणार आहे.
छाननीनंतर २७ उमेदवारी अर्ज राहिले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी १२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. महायुतीच्या भाजप उमेदवार आमदार मोनिका राजळे, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अॅड. प्रताप ढाकणे, वंचित बहुजन आघाडीचे किसन चव्हाण यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी जि. प. सदस्या हर्षदा काकडे, रासपचे आत्माराम कुंडकर, बसपचे सुभाष त्रिंबक साबळे हे निवडणूक मैदानात उतरले आहेत.
पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले प्रयत्नशील होते. दरम्यान, पक्षाची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याचे लक्षात घेऊन घुले यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्याशी संपर्क साधून त्यांची भेट घेतली होती. जरांगे यांनी उमेदवार उभे करणार नाही व कुणालाही पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केल्याने घुले यांच्यासह कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. त्यानंतर घुले यांनी समर्थकांची बैठक घेतली. अखेर शेवटच्या अर्ध्या तासात घुले यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेऊन उमेदवारी अर्ज कायम ठेवला.
किसन आव्हाड, गोकुळ दौंड, चंद्रकांत लबडे, नीलेश बोरुडे, यशवंत पाटेकर, पांडुरंग शिरसाट, स्नेहल फुंदे, अंकुश चितळे, विद्याधर काकडे, बाळू कोळसे, दिलीप खेडकर, तुळशीराम पडळकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.