“श्रीरामपूरला गतवैभव प्राप्त करून देणार, विकासासाठी ३ हजार कोटींचा निधी देणार”: अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 01:37 PM2024-11-13T13:37:58+5:302024-11-13T13:42:34+5:30
एमआयडीसीत उद्योग आणू तसेच पाणी प्रश्न सोडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर : आमचे उमेदवार लहू कानडे यांच्या माध्यमातून श्रीरामपूरसाठी पुढील काळात तीन हजार कोटी रुपयांचा निधी देऊ. एमआयडीसीत उद्योग आणू तसेच पाणी प्रश्न सोडवू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे दिली.
थत्ते मैदानावर कानडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अविनाश आदिक, भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे, अनुराधा आदिक, सत्यजित कदम, अरुण नाईक, इंद्रनाथ थोरात, अमृत धुमाळ, शरद नवले, अभिषेक खंडागळे, नितीन दिनकर, राजेश अलघ, केतन खोरे, नीलेश भालेराव आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, मतदारसंघामध्ये अजोळचे देवळाली प्रवरा समाविष्ट आहे. त्यामुळे येथे भावनिक नाते जोडलेले आहे. लहानपणी श्रीरामपूरला चित्रपट पहायला यायचो. येथील आर्थिक सुबत्ता अनुभवली आहे. ते गतवैभव पुन्हा आणू.
कांबळे ढोंग करत आहेत: पवार
श्रीरामपुरात महायुतीचे अधिकृत उमेदवार लहू कानडे की भाऊसाहेब कांबळे हा पेच होता. याबाबत बोलताना पवार म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रीरामपूरात सोमवारी सभा होणार होती. पण ती सभा मीच रद्द केली. त्याच मंडपात माझी सभा होतेय यावरुन समजून घ्या. कांबळे हे कोणत्याही पक्षाचे अधिकृत उमेदवार नाहीत. कांबळेंना अर्ज मागे घेण्याचा आदेश होता. पण ते नॉट रिचेबल झाले. आता ते आजारी पडल्याचे ढोंग करत आहेत. कानडे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचेसमक्ष झाला आहे.
कानडे हे गरिबांचा आवाज
आमदार कानडे हे साहित्यिक आहेत. रंजलेल्या गांजलेल्या लोकांचे ते प्रतिनिधी आहेत. प्रभावशाली प्रशासकीय अधिकारी होते. हागणदारीमुक्त योजनेचे जनक होते. त्यांचे कुटुंबीय उच्च शिक्षित आहेत. तरीही काँग्रेसने त्यांची उमेदवारी कापली, असे अजित पवार म्हणाले.