लोकमत न्यूज नेटवर्क शिर्डी : विखे परिवाराची शिर्डीत दहशत असल्याचा आरोप करण्यात येतो. होय आमची येथे दहशत आहे. पण ती गुंडांवर, महिलांची छेड काढणाऱ्यांवर. आमची दहशत जनकल्याणासाठी, गोरगरिबांच्या हितासाठी, कुणालाही वेदना होऊ नयेत, यासाठी असल्याचा पलटवार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर केला.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ येथील लक्ष्मीनगर भागात आयोजित प्रचार सभेत सुजय विखे पाटील यांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. यावेळी व्यासपीठावर कैलास कोते, अभय शेळके, नीलेश कोते, मंगेश त्रिभुवन, सुभाष कोतकर, प्रतीक शेळके, लक्ष्मण कोतकर, वाडेकर आदी उपस्थित होते.
साई मंदिरातील फुले बंद केल्याचा आमच्यावर आरोप करण्यात येत आहे. आरोप करणाऱ्यांनी साई समाधीवर हात ठेवून हा आरोप करावा, असे थेट आव्हान विखे पाटील यांनी विरोधकांना दिले. साई मंदिरातील फुले उच्च न्यायालयाच्या आदेशाने बंद झाली आहेत. ही फुले पुन्हा सुरू व्हावी, यासाठी विरोधक नाही तर विखे पाटील कोर्टात गेले. याबाबत २६ ऑक्टोबरला सुनावणी होऊन निकाल प्रलंबित आहे. लवकरच याबाबतचा निकाल लागेल व साईबाबांच्या कृपेने न्यायालय फुले सुरू करण्यासाठी अनुमती देईल.
प्रत्येक व्यक्तीला थीम पार्कमध्ये रोजगार : विखे
लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, सीता नगर तसेच शासकीय जमिनीवर राहणाऱ्या नागरिकांना या जमिनीत प्रत्येकी अर्धा गुंठा जागा देण्यात येणार आहे. या जमिनीचे बाजारमूल्य चाळीस ते पंचेचाळीस कोटी रुपये आहे. या प्रत्येक घरातील एका व्यक्तीला थीम पार्कमध्ये रोजगार देण्याची घोषणाही विखे पाटील यांनी केली.