लोकमत न्यूज नेटवर्क पारनेर : पाच वर्षांपूर्वी तुम्ही मला संधी दिली, त्या संधीचे मी सोने केले. लोकसभा निवडणुकीसाठी जनतेच्या व नेत्यांच्या आग्रहाखातर आमदारकीचा राजीनामा देऊन मैदानात उतरलो. त्या निवडणुकीत पारनेर मतदारसंघाची अस्मिता दिसली. मतदारसंघात निधी आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीतही तुमची साथ हवी आहे, असे आवाहन खासदार नीलेश लंके यांनी केले.
पारनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ अळकुटी येथे रविवारी सायंकाळी प्रचार सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, महानगर बँक व जिल्हा बँकेच्या संचालक गीतांजली शेळके, उमेदवार राणी लंके, बहुजन रयत परिषदेच्या अध्यक्षा अॅड. कोमल साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सीताराम काकडे, डॉ. भास्कर शिरोळे, शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका खिलारी, बाबाजी भंडारी, कुंदनमल साखला, बाळासाहेब पुंडे, सखाराम उजघरे, संतोष काटे, किरण डेरे, सुवर्णा धाडगे, गुंडा भोसले, अनिल आवारी, धोंडीभाऊ झिंजाड, किरण पानमंद, श्रीकांत डेरे, निवृत्ती गाडगे आदी उपस्थित होते.
लंके म्हणाले, जीएस महानगर बैंक संचालक गीतांजली शेळके यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची प्रचाराची धुरा अतिशय समर्थपणे जबाबदारीने पार पाडली. आताही आपणच उमेदवार म्हणून काम करा. मागील पाच वर्षात किमान दोन हजार कोटी रुपयांचा निधी आपण आणला. काही कामे प्रलंबित आहेत. महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर निधी आणणार आहोत. तालुक्यातील सर्व कामे मार्गी लागून मोठे प्रकल्प आणण्यावर आपला भर राहणार आहे, असे ते म्हणाले.
महिलांनीच निवडणूक हाती घेतली...
राणी लंके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीही हजारो महिलांनी हजेरी लावली होती. प्रचारातही महिला दिसत असून या निवडणुकीत पुरुषांचा ताण बराच कमी झाला. कोणत्याही व्यासपीठावर गेले की तिथे महिलांनी ताबा घेतल्याचे चित्र संपूर्ण निवडणुकीदरम्यान पहावयास मिळाले. महिलांनी निवडणूक हाती घेतल्यावर काय होते हे सर्वांना माहिती आहे. येथील निवडणूकही महिलांनी हाती घेतली आहे. त्यामुळे येथील उमेदवारही विजयी होणार हे निश्चित, असा विश्वास नीलेश लंके यांनी व्यक्त केला.
आरोग्यासाठी एक खिडकी योजना
मतदारसंघात एक खिडकी योजना राबविणार आहोत. जसे कोणताही आजार असेल तर त्यावर एकच डॉक्टर उपचार करू शकतो. कोणतेही काम असेल तर एकाच खिडकीत जायचे. सतरा दरवाजे फिरण्यापेक्षा एका दारात गेलेले कधीही चांगले. सगळ्या अडचणी एकाच माणसाकडून दूर होणार आहेत, असे लंके यांनी सांगितले.