लोकमत न्यूज नेटवर्क, शेवगाव : उद्धव ठाकरे यांच्या काळात झालेली सरकारची ठोस कामे सांगा. महायुतीच्या काळात झालेली कामे पाहा. दोन्ही सरकारच्या कामाची तुलना शेतकऱ्यांनी करावी. मागेल त्याला सौरपंप, शेती पंपाची वीजबिल माफी, शेतकऱ्यांना एक रुपयात विमा, लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना ही महायुती सरकारची कामे शेतकरी हिताचीच आहेत. शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीच चांगले निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे राज्यातही महायुतीचे सरकार आणण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांना पुन्हा विधानसभेत पाठवा, असे आवाहन माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.
अमरापूर (ता. शेवगाव) येथे शनिवारी दुपारी भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार मोनिका राजळे, अभय आव्हाड, दिलीप भालसिंग, अश्विनी थोरात, सुवेंद्र गांधी, अशोकराव चोरमले, शिवसेना जिल्हाध्यक्ष शोभा अकोलकर, आशाताई गरड, बापूसाहेब पाटेकर, संदीप खरड, दिनेश लव्हाट, संदीप वाणी, भीमराज सागडे, राजेंद्र जमधडे, बापूसाहेब भोसले, शिवाजी समिंदर, गंगाभाऊ खेडकर, डॉ. मृत्युंजय गर्जे, अमोल गर्जे, मुकुंद गर्ने बाबा राजगुरू यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदेसेना, आरपीआय, मित्रपक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, महाभकास आघाडीचे सरकार अडीच वर्षे सत्तेत होते. आता ते महिलांना तीन हजार देऊ म्हणतात. सत्तेत असताना का दिले नाहीत? तेव्हा झोपले होते का? पंकजाताई मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री असताना या भागात मोठा निधी दिला. आमदार मोनिका राजळे यांनी शेवगाव, पाथर्डीचा विकास केला ही मोठी गोष्ट आहे. महिलेने नेतृत्व करावे ही अभिमानाची गोष्ट आहे. राजीव सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले. श्रीकांत मिसाळ यांनी आभार मानले.
ते अडीच वर्षे घरात बसले...
मागील निवडणुकीत शिवसेना- भाजप युतीला जनतेने कॉल दिला. उद्धव ठाकरे यांनी लगेचच सर्व पर्याय खुले असल्याचे सांगून काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यासोबत अनैसर्गिक सरकार स्थापन केले. त्यांच्या काळात एक तरी शेतकरी हिताची योजना राबविली का, असा सवाल त्यांनी केला. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले. अडीच वर्षे घरात बसले. त्यांच्यात वाद होऊन एक गट फुटला आणि आमच्यात आला. मग महायुतीचे सरकार आले. या काळात शेतकरी जनहिताच्या योजना राबविल्या, असा दावा दानवे यांनी केला.