लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: उमेदवारी न मिळाल्याने मित्रपक्षांतील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली खरीः पण यातील कोण थांबणार आणि कोण लढणार हे दिवाळीनंतरच स्पष्ट होईल. माधारीनंतर खऱ्या अर्थाने प्रचारही सुरू होणार असल्याने दिवाळीनंतर प्रचाराचे फटाके फुटण्याचीच शक्यता आहे.
महाविकास आघाडी व महायुतीने जिल्ह्यातील १२ मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. महाविकास आघाडीत व महायुतीत प्रत्येकी तीन-तीन घटकपक्ष आहेत. एका पक्षाला उमेदवारी मिळाल्याने इतर दोन पक्षांत कमी अधिक प्रमाणात नाराजी आहे.
काहींनी उमेदवारी अर्ज दाखल करत नाराजी उघडपणे व्यक्त केली आहे; पण पक्षाच्या विरोधात भूमिका घेऊन अपक्ष निवडणूक लढविणे मोठे आव्हान असते, असे असले तरी बड्या नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पण, ते खरोखर लढणार की र्थांबणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
अकोले मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार किरण लहामटे हे अधिकृत उमेदवार आहेत. तरीही भाजपाचे माजी आमदार वैभव पिचड यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला, त्यांची पक्षाकडून मनधरणी सुरू आहे. ते अर्ज मागे घेणार की लढणार, हे माघारीच्या दिवशी स्पष्ट होईल. शिर्डी मतदारसंघात महायुतीचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु, भाजपचे राजेंद पिपाडा यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यांचीही मनधरणी पक्षश्रेष्ठींकडून सुरू आहे. नेवासा मतदारसंघात महायुतीचे विठ्ठल लंघे अधिकृत उमेदवार आहेत. तरीही भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी प्रहार जनशक्तीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांना थांबविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. ते थांबणार की लढणार, याबाबत उत्सुकता आहे. श्रीगोंद्यात महाविकास आघाडीच्या अनुराधा नागवडे अधिकृत उमेदवार आहेत. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार राहुल जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. ते निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे माजी महापौर अभिषेक कळमकर हे अधिकृत उमेदवार आहेत.
परंतु, मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे सेनेच्या तिघाजणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. गतवेळी शिवसेनेने निवडणूक लढविली होती. यंदा ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला गेल्याने उद्धव ठाकरे सेनेत नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
महाविकास आघाडीचे आमदार संग्राम जगताप अधिकृत उमेदवार आहेत. असे असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मित्रपक्ष असलेल्या भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनीही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बंडखोरांना रोखण्याचे आव्हान कमी अधिक प्रमाणात सर्वच राजकीय पक्षांसमोर आहे.