आशुतोष काळे यांना जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला देणार: अजित पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2024 09:21 AM2024-11-15T09:21:56+5:302024-11-15T09:22:58+5:30
आशुतोष काळे यांच्या प्रचारासाठी कोपरगावात सभा
लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव : मागील निवडणुकीत आशुतोष काळे यांना साडेआठशेचे लीड मिळाले. यंदा कोल्हे यांनी पक्षाच्या सांगण्यानुसार थांबण्याचा निर्णय घेतला, त्यांचे धन्यवाद. आता आशुतोष काळे यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. जेवढे लीड, तेवढा जास्त निधी कोपरगावला दिला जाईल. आशुतोष काळे यांना चांगली जबाबदारीसुद्धा दिली जाईल, हा माझा वादा आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी झालेल्या सभेत पवार बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. प्रारंभी आमदार काळे म्हणाले, पाच वर्षांत केलेल्या विकासकामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहे. कर्मवीर शंकरराव काळे यांनी सतत जनतेची कामे करीत राहण्याची शिकवण दिली. त्याच मार्गावर मी वाटचाल करीत आहे. अजित पवार यांनी मागील पाच वर्षांत भरपूर निधी दिला आहे. आपले सरकार पुन्हा येणार आहेच. तेव्हा पालखेड लाभक्षेत्रात उपसा सिंचन योजना सुरू करावी, पश्चिमेचे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविण्याची योजना पूर्णत्वास न्यावी, झगडे फाटा ते संगमनेर आणि कोपरगाव ते वैजापूर या रस्त्यांच्या कामासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, उच्चशिक्षित, जनतेसाठी काम करणारा आमदार कोपरगावच्या जनतेने मागील निवडणुकीत दिला. विधिमंडळात देखील काळे यांनी धडाडीने काम केले आहे. आशुतोष काळे यांनी स्वतःसाठी काहीही मागितलेले नाही. ते मागतात ते मतदारसंघाच्या विकासासाठी मागतात. त्यांचे सर्व हट्ट मी पूर्ण केले आहेत. आता कोपरगावकरांनी त्यांना ८५ हजार मतांचे लीड द्यावे. त्याचे पुढचे सर्व हट्ट मी पूर्ण करतो. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसीम चोपदार यांनी आशुतोष काळे यांना पाठिंबा दिला. चोपदार यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी चारूदत्त सिनगर, विजय वहाडणे, रवींद्र बोरावके, महेमुद सय्यद यांची भाषणे झाली. व्यासपीठावर चैताली काळे, कपिल पवार, राजेश परजणे, अशोकराव रोहमारे, नितीनराव औताडे, राजेंद्र जाधव, विश्वासराव महाले, रावसाहेब रोहोम, धनंजय जाधव, कृष्णा आढाव, दत्ता काले, सुनील गंगुले, आदींची उपस्थिती होती.
मायचा लाल योजना बंद करू शकत नाही
लाडकी बहीण योजना बंद होईल, असा कांगावा विरोधक करीत आहेत. त्यांच्या काळात त्यांनी सव्वा रुपया दक्षिणाही कुणाला दिली नाही. लाडकी बहीण योजना सुरू केल्याने महिला समाधानी आहेत. योजना सुरू ठेवण्यासाठी महायुती सरकारला पुन्हा निवडून द्या, पाच वर्षे ही योजना कोणी मायचा लाल बंद करू शकणार नाही, असेही अजित पवार म्हणाले.