लोकमत न्यूज नेटवर्क, अहिल्यानगर: विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघात १५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये केवळ नऊ महिला उमेदवारांचा समावेश आहे. चार महिलांना मान्यताप्राप्त पक्षांकडून तर पाच महिला अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
शेवगाव विधानसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यामध्ये दोन महिला निवडणूक लढवत असून मोनिका राजळे यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहेत, तर हर्षदा काकडे अपक्ष उमेदवार आहेत. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून एकूण १६ उमेदवार असून एकही महिला उमेदवार नाही.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक सोळा उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये तीन महिला उमेदवार असून अनुराधा नागवडे यांना उद्धवसेनेकडून अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. तर रत्नमाला ठुबे व सुवर्णा पाचपुते अपक्ष उमेदवार आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघातून एकही महिला उमेदवार नाही. दुसरीकडे कर्जत-जामखेड मतदारसंघात अकरा उमेदवार आहेत. परंतु एकही महिला उमेदवार नाही.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून दोन महिला उमेदवार आहेत. काँग्रेसकडून प्रभावती घोगरे यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे तर रेश्मा शेख अपक्ष उमेदवार आहेत. दुसरीकडे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून १३ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. परंतु एकही महिला उमेदवार नाही. अकोले मतदारसंघात एकूण ९ उमेदवार निवडणूक लढवत असून एकही महिला उमेदवार नाही. अहमदनगर शहर मतदारसंघातून १४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये एकमेव अपक्ष मंगल भुजबळ महिला उमेदवार आहेत.
पारनेर विधानसभा मतदारसंघातून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात राणी लंके एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून (शरद पवार) अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. नेवासा विधानसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. परंतु एकही महिला उमेदवार नाही. दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघात तेरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात देखील एकही महिला उमेदवार नाही.
या पक्षांनी दिली उमेदवारी
जिल्ह्यात काँग्रेस, भाजप, उद्धवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांनी प्रत्येकी एका महिलेला पक्षाची अधिकृत उमेदवारी दिली आहे. श्रीरामपूर, कोपरगाव, कर्जत, संगमनेर, अकोले, नेवासा आणि राहुरी अशा सात मतदारसंघांतून एकही महिला उमेदवार नाही.
गत निवडणुकीत सहा उमेदवार
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातून सहा महिला उमेदवार होत्या. यामध्ये भाजपकडून मोनिका राजळे व स्नेहलता कोल्हे यांना अधिकृत पक्षाची उमेदवारी मिळाली होती. तर चार महिलांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.