लोकमत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर : संगमनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात उमेदवारी करतील अशी शक्यता होती. मात्र, या मतदारसंघात विखे यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. तेथे शिंदे सेनेचे अमोल खताळ हे महायुतीचे उमेदवार आहेत.
जिल्ह्यात मंगळवारी बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे-पाटील, शिवाजी कर्डिले या प्रमुख नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील बारा मतदारसंघांत २८८ उमेदवारांनी ४१५ अर्ज दाखल केले आहेत.
अहिल्यानगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिषेक कळमकर यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र, येथे सेनेच्या ठाकरे गटाच्या तीन नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. माजी महापौर संदीप कोतकर यांच्या पत्नी सुवर्णा कोतकर यांनीही अर्ज दाखल केला आहे.
नेवासा मतदारसंघातही महायुतीत शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार असताना भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी अर्ज दाखल केलेला आहे. श्रीरामपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघात अजित पवार गटाकडून लहू कानडे, तर शिंदे गटाकडून भाऊसाहेब कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या दोघांनीही एबी फॉर्मसह अर्ज दाखल केले.
जिल्ह्यात पक्षनिहाय जागावाटप
जिल्ह्यात बारा मतदारसंघांपैकी महायुतीत भाजप व अजित पवार गटाने प्रत्येकी पाच जागांवर अर्ज दाखल केले आहेत, तर शिंदे सेनेने तीन जागांवर अर्ज दाखल केले. श्रीरामपूर मतदारसंघात अजित पवार व शिंदे सेना या दोन्ही गटांचे अर्ज आहेत. महाविकास आघाडीत शरद पवार गटाने सर्वाधिक सात जागांवर अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसने तीन, तर ठाकरे गटाने दोन जागांवर अर्ज दाखल केले.