लोकमत न्यूज नेटवर्क, पारनेर: श्रीगोंदा विधानसभेची जागा राष्ट्रवादीला द्यावी व पारनेर-नगर विधानसभा जागा उद्धवसेनेला द्यावी, असा आग्रह महाविकास आघाडीच्या श्रेष्ठींकडे धरला होता. मात्र सेना नेते श्रीगोंदा येथील जागेवर ठाम राहिल्याने पारनेरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मिळाली. विधानसभेची जागा देऊ, असा कोणताही शब्द उद्धवसेनेला दिलेला नव्हता, अशी माहिती खासदार नीलेश लंके यांनी दिली.
शिवसेना उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, पारनेर तालुकाप्रमुख डॉ. श्रीकांत पठारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांची साथ सोडत उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीबरोबर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तशी भूमिका निष्ठावान उद्धवसेनेच्या शिवसैनिकांनी गुरुवारी पारनेर येथे पत्रकार परिषद जाहीर केली. यावेळी ते बोलत होते.
पारनेर तालुक्यातील सर्व निष्ठावान शिवसैनिक विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत, असेही यावेळी डॉ. भास्कर शिरोळे यांनी सांगितले. यावेळी नीलेश खोडदे, किसन सुपेकर, अलका देशमुख, राजू शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.
स्थानिक स्वराज्यला संधी देण्याचे ठरले होते...
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यासमवेत नगरच्या यश पॅलेसमध्ये उद्धवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली होती. त्यावेळी विधानसभेच्या उमेदवारीचा कोणताही शब्द देण्यात आला नव्हता. निष्ठावान शिवसैनिकांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचा शब्द नीलेश लंके यांनी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्या उपस्थितीत दिला होता, असे यावेळी माजी पंचायत समिती सदस्य डॉ. भास्कर शिरोळे यांनी सांगितले.