लोकमत न्यूज नेटवर्क, कोपरगाव : सध्याचे सरकार भ्रष्टाचारी आहे. महाराष्ट्राचे राजकारण आम्हाला बदलायचे आहे. त्यासाठी तरुण पिढीला आम्ही संधी देत आहोत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
कोपरगाव मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वर्षे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार भास्कर कगरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांची उपस्थिती होती.
पवार म्हणाले की, सरकारने लाडकी बहीण योजना आणली. मुलींना व महिलांना १,५०० रुपये दिले जातात. पण, या रकमेतून त्यांचे प्रश्न कायमचे सुटणार नाहीत. पैसे देताय, पण मुली, महिला असुरक्षित आहेत. मागील काही काळात ७०० पेक्षा जास्त अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. महिलांना संरक्षण व सन्मानाची खरी गरज असल्याचे ते म्हणाले.
गोदावरी ही कोपरगावची ओळख होती. पण ती ओळख बदलली असून आपण गतवेळी ज्यांना संधी दिली ते आमच्याशी अप्रामाणिक झाले, अशी टीका पवारांनी आमदार आशुतोष काळे यांच्यावर केली. वर्षे म्हणाले, यापूर्वी येथे तुल्यबळ काळे-कोल्हे घराण्यात निवडणूक होत असे. यंदा माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला पवारांनी उमेदवारी दिली. मी नगरपालिकेला पराभूत झालो अशी टीका केली जाते. मात्र, यापूर्वी नगरपालिकेला पराभूत झालेले भीमराव बडदे खासदार झाले होते. त्याची पुनरावृत्ती होणार आहे.
अमृता वाकचौरे, प्रा. नीलेश कराळे, शिवाजीराव ढवळे, शिवाजी ठाकरे, नितीन शिंदे, दिलीप लासुरे, अॅड. नितीन पोळ यांची भाषणे झाली. मंचावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, संजय सातभाई, जितेंद्र रणशुर, मंगेश औताडे, बाळासाहेब गायकवाड, सुहास वहाडणे, कैलास जाधव, सनी वाघ, संदीप वर्षे यांच्या मातोश्री प्रमिला वर्षे व बंधू समीर वर्षे आदी उपस्थित होते.
सध्याचे सरकार भ्रष्टाचाराच्या पायावर उभे- थोरात
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सात दिवसांत कर्ज माफीचा निर्णय घेतला होता. कोरोना काळातही सर्वात चांगले काम महाराष्ट्रात झाले होते. आताचे महायुतीचे सरकार भ्रष्टाचाराच्या पायावर उभे आहे. रोजगाराचे, शेतकऱ्यांचे प्रश्न जशाला तसे आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे हे सरकार घालवायचे असल्याचे थोरात म्हणाले.