लोकमत न्यूज नेटवर्क, केडगाव : निष्ठावान शिवसैनिक उपद्व्याप करत नाहीत. तुम्ही शिवसेनेचे निष्ठावान म्हणता, दुसरीकडे भाजपचे टेडर भरता, मग तुम्ही कसले निष्ठावान शिवसैनिक? उद्धव ठाकरे यांना अपमानास्पद पद्धतीने वर्षा बंगल्याबाहेर काढले. त्याचा बदला घेण्याची वेळ आलेली असताना तुम्ही बंडखोरी करता, अशी टीका खासदार नीलेश लंके यांनी अपक्ष उमेदवार संदेश कार्ले यांचे नाव न घेता केली.
पारनेर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांच्या प्रचारार्थ निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) येथे महाविकास आघाडीचा शुक्रवारी मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. शशिकांत गाडे होते. यावेळी माधवराव लामखडे, प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, घनश्याम म्हस्के, बाळासाहेब कोतकर, संजय जपकर, आबासाहेब कर्डिले, शिवा होळकर, पोपट खामकर, एकनाथ झावरे, साहेबराव बोडखे, अजय लामखडे, विद्या भोर, बाळासाहेब गायकवाड, केतन लामखडे, गंगाधर रोहकले, वसंत पवार, अशोक शिंदे, मंजाबापू निमसे, व्ही. डी. काळे, अशोक धनवटे, शंकर साठे, छबू महांडुळे, तुकाराम कातोरे, भाऊराव गायकवाड, बाळासाहेब पानसंबळ, पप्पू कोल्हे आदी उपस्थित होते.
शिवसेनेची व्याख्या मला सांगू नका. माझ्या हातात आजही शिवबंधन आहे. स्वाभिमानी मतदार बंडखोरी खपवून घेणार नाही. लोक बुक्क्याच्या नव्हे तर गुलालाच्या गाडीत बसतात. आमच्या व्यासपीठावर निष्ठावान लोक असल्याचे लंके यांनी सांगितले.
अहिल्यानगर तालुक्याची लाडकी बहीण..
टक्केवारी न सांगता विश्वासाने काम करा. अहिल्यानगर तालुक्यातील शिवसैनिकांनी महाविकास आघाडीचे काम करावे. तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी राणी लंके यांच्या पाठीशी आहेत. सर्वजण एकसंधपणे प्रचार करणार आहेत. सकाळी एक व रात्री एक असे होणार नाही. तालुक्याची लाडकी बहीण म्हणून सर्वांनी राणी लंके यांच्या पाठीशी राहावे, असे कामरगावचे माजी सरपंच वसंत ठोकळ म्हणाले.