लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येथील अष्टपैलू क्रिकेटपटू अझीम काझी याने मंगळवारी महाराष्ट्र संघाकडून खेळताना १२ चौकार, २ उत्तुंग षटकार ठोकत १०४ धावा चोपल्या. मुंबईकर धवल कुलकर्णीच्या वेगवान माऱ्यापुढे ढासळलेला महाराष्ट्र संघाचा बुरुज अझीम काझीने सावरला. या मोसमातील अझीमचे पहिले शतक झळकताच नगरकरांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अझीमवर कौतुकाचा वर्षाव केला.
जयपूर येथील मैदानात मंगळवारी (दि. २३) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र विरुद्ध मुंबई असा सामना रंगला. महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. महाराष्ट्राचा कॅप्टन रुतुराज गायकवाड व यश नहारने डावाची सुरुवात केली. १५ चेंडूत १९ धावांवर असताना गायकवाड हा धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर आलेला नौशाद शेख, केदार जाधव, अंकित बावणेही धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर ठरावीक अंतराने बाद झाले. त्यावेळी ३८ धावांवर ४ बाद अशी बिकट अवस्था महाराष्ट्र संघाची झाली होती. बावणे बाद झाल्यानंतर नगरचा अझीम काझी मैदानावर आला. त्याने सावध सुरुवात करताना नहारच्या साथीने धावफलक हलता ठेवला. दोघांनीही द्विशतकी भागीदारी केली. यात अझीम काझीने ११८ चेंडूचा सामना करीत १२ चौकार व २ उत्तुंग षटकार लगावत शतक पूर्ण केले. विजय हजारे ट्रॉफीतील या मोसमातील काझीचे हे पहिलेच शतक ठरले. वैयक्तिक १०४ धावांवर असताना सूर्यकुमार यादवकडे झेल देत अझीम बाद झाला. त्यावेळी संघाची धावसंख्या २५२ झाली होती. काझी बाद झाल्यानंतर नहार (११९) हा देखील लवकरच बाद झाला अन् पुढे २७ धावा जोडत महाराष्ट्राचा खेळ आटोपला.
२८० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईच्या यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे यांनी मुंबईला विजय मिळवून दिला. मुंबईच्या जैस्वाल याला बाद करून अझीमने एक बळी मिळविला.