अहमदनगर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून लोकांना 10 रुपयात सकस जेवण देऊ असं वचननाम्यात जाहीर करण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांनी शिवसेनेवर टीका सुरु केली आहे. 10 रुपये थाळी देणार असं शिवसेना म्हणते मग 12 कोटी महाराष्ट्राचं विचारतो, झुणका भाकरचं काय झालं? शिववडा त्याचं काय झालं? तरीही म्हणत असतील तर गेल्या 5 वर्षात तुम्ही काय केलं? याची उत्तर द्या असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवसेनेला सांगितलं आहे.
अहमदनगर येथील जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना कोल्हे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की,शिवसेनेच्या उमेदवारांना मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? 3 सप्टेंबरला मंत्रिमंडळात निर्णय झाला गड-किल्ले भाडेतत्त्वार देण्यात येणार. त्यावेळी शिवसेनेचे मंत्री मूग गिळून गप्प बसले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले भाडेतत्वावर देताना शिवसेना मूग गिळून गप्प बसणार असतील तर त्याचं उत्तर शिवसेनेने महाराष्ट्राला दिलं आहे. मग सांगा तुम्हाला मत मागण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा सवालही अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.
तसेच यावेळी अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, अंगाला तेल लावून बसलोय, समोर पैलवान नाही, पुढून,मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही. जर समोर पैलवान नसतील देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याठिकाणी आखाडा खणायला येतायेत का? लहानपणी आमच्यावर संस्कार होते. जर मुलगा परिक्षेत नापास झालं तर बापाला घेऊन यावं लागतं, आता ते तुम्ही समजा काय झालं अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
महाराष्ट्राचं वातावरण फिरलंय, आता एकच लाट शरद पवार, हा महाराष्ट्रातील तरुण, शेतकरी, महिलांनी हे ठरवलं आहे. भाजपा-शिवसेना एक अजगर आहे, सर्व प्राण्यांना गिळंकृत करत चाललेला, एकदा फुस्स करायचं तर चौकशी, मोठा प्राणी दिसला की परत फुस्स सीबीआय अन् त्याहून मोठा प्राणी सापडला तर ईडी अशाप्रकारे हा अजगर महाराष्ट्राला विळखा घालण्याचा तयारी करतोय. मात्र या अजगाराचा बिमोड करण्याचं काम शरद पवारच करणार आहेत असं त्यांनी सांगितले.