अहमदनगर - विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही. गेल्या ५ वर्षांतला युतीचा कारभार म्हणजे फटा पोस्टर निकला झिरो असं म्हणायची वेळ आलीय. तरी 'मी पुन्हा येणार' असं CM सांगतात. कशासाठी? असा सवाल राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी विचारला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, 'मी पुन्हा येणार' असं मुख्यमंत्री सांगतात. कशासाठी? राज्याला कर्जबाजारी करण्यासाठी, बेरोजगारी वाढवण्यासाठी, संसार रस्त्यावर आणण्यासाठी, शेतकरी आत्महत्या वाढवण्यासाठी,साखर-कांदा आयात करण्यासाठी पुन्हा यायचंय? असा टोला अजित पवारांनी लगावला
तसेच शिक्षण संस्थांचं जाळं उभारल्यानं बारामती विकासात्मक दृष्टिकोनातून आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगती पथावर आली. कर्जत-जामखेड मतदारसंघातही चांगल्या दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील. महिला बचत गटाच्या वस्तू देखील बाजारात विकल्या जातील, अशी तरतूद करू असं आश्वासन अजित पवारांनी लोकांना दिलं.
दरम्यान, कर्जत जामखेड मतदारसंघाचा रोहित पवार चांगल्या पद्धतीनं प्रतिनिधित्व करतील,असा मला विश्वास आहे. कुणाला कमीपणा वाटेल,असं काही घडणार नाही. तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी करायचा असतो, असं शरद पवार नेहमी सांगत आले आहेत. त्यामुळे रोहितला निवडून द्यावं असं आवाहन अजित पवारांनी लोकांना केले. त्यापूर्वी बीडमध्ये झालेल्या सभेतही अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला. भाषण करताना बोलले ते तोलले पाहिजे. खोटे भाषण करणे आणि फसवणूक करणे याचा धंदा झाला आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा, वाढत जातीयवाद या प्रमुख समस्या असताना भाजपचे सरकार मेक इन इंडिया, शायनिंग इंडिया यामध्ये व्यस्त आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने सुरु केलेली शेतकरी कर्ज माफी योजना सपशेल फसवी असून हे भर सभेत पुराव्यानिशी अजित पवारांनी उपस्थितांना दाखवले. ज्याचं जळत त्यालाच कळत यामुळेच इतिहासात प्रथमच शेतकरी संपावर गेले. महाराष्ट्राची सत्ता आमच्या हातात द्या तीन महिन्यात ७/१२ कोरा करू असा दावा अजित पवारांनी शेतकऱ्यांना केला.