अहमदनगर : कर्जत-जामखेडमध्ये भाजपाचा राम शिल्लक राहिला नाही ही हेडलाइन 24 तारखेला वर्तमानपत्रांची असेल, असा हल्लाबोल राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी भाजपावर केला आहे, ते रोहित पवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या कर्जत-जामखेडच्या सभेत बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्रात सध्या कर्जत-जामखेडचीच चर्चा सुरू आहे. या तरुणाने भाजपाची झोप उडवली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री तीन-तीन सभा कर्जत-जामखेडमध्ये घेत आहेत, असा टोलाही शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. नव्या पिढीला काम नाही. तर दुसरीकडे कारखाने, कंपन्या बंद होत आहेत, अशा पद्धतीची भाजपाची राजवट सुरू आहे, अशी टीकाही पवारांनी केली आहे.52 वर्षांपूर्वी मी आज रोहित ज्या वयात आहे, त्या वयात मी विधानसभेला उभा होता. बारामतीमध्ये त्यावेळी काही नव्हते. त्या गावाचा चेहरा बदलला. परिवर्तन झालं. रोहितने कर्जत-जामखेडची गेली पाच वर्षे जबाबदारी घेतली आहे. या गावाची ओळख दुष्काळी भाग आहे. त्यावेळी दुष्काळ बघायला पंडित नेहरू, इंदिरा गांधी आल्या होत्या. या तरुणाने या विभागाचा चेहरामोहरा कसा बदलला हे बघायला यापुढील दिवसात पंतप्रधान आल्याशिवाय राहणार नाही, असा शब्द शरद पवार यांनी यावेळी जनतेला दिला. बारामतीला विकास व्हायला 20 वर्षे लागली. परंतु रोहित ते पाच वर्षांत करून दाखवेल याची मला खात्री आहे, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
भाजप सरकारच्या काळात राज्यात १६ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. अनेक उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली. यामुळे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आघाडीच्या पाठिशी आहे. या निवडणुकीत तरुणांनी भाजपची झोप उडविली आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी कर्जत येथे केली. कर्जत-जामखेड मतदार संघात पवारांचे नातू रोहित पवार हे उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या सांगता सभेसाठी शनिवारी पवार आले होते. पावसामुळे हेलिकॉप्टर लँड होण्यात अडचणी होत्या. त्यामुळे पवार हे कारने कर्जतला आले. पावसामुळे सभास्थळी बसण्यास जागा नव्हती. त्यामुळे लोकांनी उभे राहून सभा ऐकली. सभेत पवारांनी भाजप सरकारवर टीका केली. रोहितला संधी मिळाल्यास कर्जत जामखेडचा बारामतीसारखा विकास करुन दाखवू. कुस्ती खेळताना समोर तगडा प्रतिस्पर्धी हवा. कुस्ती कशी खेळतात हे भाजपवाल्यांना २४ तारखेलाच कळेल, असेही ते म्हणाले.