अहमदनगरः कर्जत-जामखेड मतदारसंघात रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात अटीतटीची लढत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी 9 हजारांहून अधिकची आघाडी घेतली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार आणि फडणवीस सरकारमध्ये मंत्री राहिलेले राम शिंदे पराभवाच्या छायेत आहेत. या विजयी आघाडीनंतर रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली आहे. या मतदारसंघात वेगवेगळी राजकीय समीकरणं आतापर्यंत वापरली गेली आहेत. सर्व राजकीय समीकरणं तोडून आम्ही सर्वजण एकीचा, विकासाचा संदेश घेऊन आलो आहोत, आम्हाला या परिसराला चांगल्या दृष्टिकोनातून पुढे न्यायचं आहे. हे सर्व मुद्दे लोकांना पटले आणि आवडले, त्यामुळे आम्ही सर्व जातीय समीकरणांचं राजकारण तोडून लोकांच्या हिताचं राजकारण करून दाखवू. लोकांना आमची भूमिका पटली म्हणून आम्हाला आघाडी मिळाली आहे. आम्ही लवकरात लवकर कामाची सुरुवात करणार आहोत. राज्याच्या विकासासाठी अजित पवार, शरद पवार आणि जयंत पाटील योग्य निर्णय घेतील. राज्यात विकासाला उंचावर नेण्याचं काम आम्ही नक्कीच करू, असंही रोहित पवार म्हणाले आहेत.
महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019: जातीय समीकरण, गटातटाचं राजकारण तोडून लोकांसाठी केलेल्या कामाची ही पोचपावती : रोहित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:00 AM