शिर्डी - साई संस्थानकडून पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत करण्यात येणार आहे. साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच 20 डॉक्टर्सची टीम पूरग्रस्त भागात मदतीसाठी जाणार आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 10 कोटी रुपयांचा निधी हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याची माहिती सुरेश हावरे यांनी शनिवारी (10 ऑगस्ट) दिली आहे.
राज्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या जलप्रलयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील परिस्थिती अतिशय बिकट आहे. हजारो नागरिक बेघर झाले आहे. नैसर्गिक आपत्ती भीषण असून राष्ट्रीय कर्तव्य समजून पूरग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णय साईबाबा संस्थानच्या वतीने घेण्यात आल्याची माहिती सुरेश हावरे यांनी दिली आहे. तसेच वैद्यकीय मदत आणि औषधं पूरग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत.
कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली. स्वत: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी पूरस्थळी भेटी देऊन सरकारी यंत्रणा गतिमान केली.
सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने 154 कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे 13 जिल्ह्यातील तब्बल 2 लाख 1 हजार 496 हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूरआणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले असल्यास त्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत बागांची पुनर्उभारणी करण्यासाठी शंभरटक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. फलोत्पादन मंत्री क्षीरसागर यांनी विभागातील कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करणार याची माहिती दिली. कृषी आयुक्त सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते.