अहमदनगर : भाजप, एनडीए आघाडीला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदनगर येथील सभेत सांगितले.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी अहमदनगर येथे सावेडी भागात पंतप्रधान मोदी यांच्या सभेच्या आयोजन केले होते. या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.
ते म्हणाले, काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम लीगचा जणूकाही जाहीरनामा आहे. ओबीसी एससी आदींचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देण्याचा इरादा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येत आहे. काँग्रेस हे संविधान बदलण्याचे काम करत आहे.
श्रद्धा, सबुरी हा मंत्र जगाला देणाऱ्या साईबाबांच्या चरणी नतमस्तक होतो, अहिल्यादेवी होळकर यांना कोटी कोटी अभिवादन, माळीवाडा गणपतीला नमन अशी मराठीतून मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. अहमदनगरचा उल्लेख ही त्यांनी अहिल्यानगरची पुण्यभूमी को प्रणाम असा केला.
बीजेपी व एनडीए आघाडीला भरपूर प्रतिसाद मिळत आहे. एनडीएच्या जाहीरनाम्यामध्ये विकास, गरिबाचे कल्याण, राष्ट्रीय सुरक्षा आदी विषयांना प्राधान्य दिले आहे. परंतु यापैकी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे? असा सवालही त्यांनी केला.
काँग्रेसने खिसे भरण्याचे पाप केले
१९७० पासून निळवंडेचे काम रखडले होते. काँग्रेसच्या काळात फक्त खिसे भरण्याचे पाप केले. मात्र २०१९ मध्ये देवेंद्र फडवणीस यांनी निधी देऊन निळवंडे धरणाचे काम पूर्ण केले.
मुंबई हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांचा काँग्रेसने अपमान केला आहे. असा अपमान करणाऱ्या काँग्रेसला महाराष्ट्रात एकही सीट मिळणार नाही, याची तजवीज मतदारांनी केली पाहिजे असेही मोदी यांनी आवाहन केले.