- शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शिर्डीचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी मेहनत मेहनत घ्यावी लागेल असे महसूल मंत्री विखे पाटील आपल्याला म्हणाले. मात्र लोखंडेना निवडून आणण्याची मोठी जबाबदारी विखे पाटील यांच्यावर आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सोमवारी सायंकाळी राहता येथे पार पडलेल्या महायुतीच्या सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना नेते रामदास कदम, नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर, मंत्री दादा भुसे, मंत्री दीपक केसरकर, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आमदार आशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, वैभव पिचड, भाऊसाहेब कांबळे,बाळासाहेब मुरकुटे, अविनाश आदिक आदी यावेळी उपस्थित होते.
उमेदवार लोखंडे यांच्या भाषणावेळी काही कार्यकर्त्यांनी खालून घोषणाबाजी केली. महसूलमंत्री विखे पाटील यांचे नाव भाषणात घेण्याची त्यांची मागणी होती. हे कार्यकर्ते मंचाच्या उजव्या बाजूला पत्रकार कक्षाजवळ उभे होते. यानंतर थोड्याच वेळात मंचावरून लोखंडे यांना एक चिठ्ठी देण्यात आली. त्यानंतर लोखंडे यांचाही थोडा गोंधळ उडाला. त्यांनी लगेचच चिठ्ठी पाहताच विखे पाटील यांच्यामुळे उमेदवारी मिळाल्याचे जाहीर करून टाकले. या प्रकाराची मात्र उपस्थितात चर्चा झाली.