अहमदनगर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नुकत्याच दहावी व बारावीच्या परीक्षा घेण्यात आल्या. शासनाने यंदा काॅपीमुक्त अभियान राबविण्याचे ठरवले होते. मात्र नगर जिल्ह्यात बारावीला ५८, तर दहावीला ५ असे एकूण ६३ विद्यार्थी काॅपी करताना आढळले. आता या विद्यार्थ्यांची विभागीय मंडळासमोर सुनावणी होणार आहे.
यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च, तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च दरम्यान पार पडली. यंदा शिक्षण विभागाने काॅपीमुक्त अभियान राबवून आपापल्या जिल्ह्यात एकही काॅपी होणार नाही, याची खबरदारी सर्व विभागांनी निवडणूक अभियानाप्रमाणे सामूहिकरित्या घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हास्तरावर भरारी पथके, बैठे पथके नेमून, तसेच स्थानिक पातळीवर तालुकास्तरीय पथकांची नेमणूक करून परीक्षेतील गैरप्रकार रोखण्याचा प्रयत्न झाला. मात्र तरीही विद्यार्थ्यांची काॅपी प्रकरणे समोर आलीच.
यंदा बारावीच्या ५८, तर दहावीच्या ५ अशा एकूण ६३ विद्यार्थ्यांनी काॅपी केली. यात सर्वाधिक पाथर्डी व पारनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पथकाने या विद्यार्थ्यांचे पेपर जमा करून दुसरा पेपर देत तात्पुरती कारवाई केली. परंतु आता या काॅपीप्रकरणांची विभागीय मंडळामार्फत तपासणी होणार आहे. यात विद्यार्थी, संबंधित मुख्याध्यापकांना सुनावणीसाठी बोलावण्याची शक्यता आहे.