Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. अनेक मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असाच सामना होत आहे,पारनेर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्याविरोधात अजित पवार गटाचे काशिनाथ दाते निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, या मतदारसंघात आज मोठी घडामोड झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेतच काशिनाथ दाते यांना लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पारनेरमध्ये जाहीर सभा झाली. या सभेवेळी लंके यांचे कट्टर विरोधक विजय औटी यांनी काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिला. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पारनेर तालुक्यात आल्यावर माझ्या आजोळी आल्यासारखं वाटतं. अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पार्श्वभूमी मला माहीत आहे. पारनेरच्या जागेबाबत महायुतीतील इतरही पक्षाने मागणी केली होती. मागे एकदा बबनराव पाचपुते यांनी जसं जसं वेगळी वाट धरली, तेव्हा पाच-सहा विरोधकांना एकत्र केलं होतं. तसंच पारनेरमधील पाच ते सहा जणांना एकत्रित करुन उमेदवारी देण्यात आली आहे. जे काशिनात दाते यांच्यासोबत आले आहेत, त्यांचा योग्यवेळी योग्य सन्मान केला जाईल, असंही अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, मागासवर्ग समाजाच्या डोक्यामध्ये यांवी संविधान बदलणार असं टाकलं. चुकीचा फेक नेरेटीव्ह काँग्रेसने सेट केला. 'अब की बार 400 पार' करुन संविधान बदलायचे असा संदेश त्यांनी दिला. वास्तविक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार दिला होता. संविधान चांगले आहे, जोपर्यंत चंद्र, सूर्य आहेत तोपर्यंत कोणही संविधानाला हात लावू शकत नाही, असंही अजित पवार म्हणाले. आज आम्ही सर्व जिल्ह्यात संविधान भवन बांधत आहेत, कुणीही गैरसमज करुन घेण्याची गरज नाही. किरकोळ दुरुस्ती असेल तर तो निर्णय पार्लमेंट घेत असतं, असंही अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या सभेवेळी पारनेर विधानसभेचे अपक्ष उमेदवार विजय औटी यांनी उपस्थित राहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काशिनाथ दाते यांना पाठिंबा दिला. औटी हे निलेश लंके यांचे कट्टर विरोधक आहेत. लंके यांच्याविरोधात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असल्यामुळे मोठी चुरस होणार आहे.