राहुरी : कृषी क्षेत्रासाठी अद्ययावत तंत्रज्ञान अत्यंत आवश्यक आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नावलौकिकाप्रमाणे विद्यापीठाला गतवैभव प्राप्त करून सर्वांच्या सहकार्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ हा ग्लोबल ब्रॅण्ड तयार करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूचा पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. पाटील स्वागत समारंभात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. यावेळी व्यासपीठावर पंजाब राज्य शासनाचे कर विभागाचे आयुक्त नीळकंठ आव्हाड, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव मोहन वाघ आणि माजी शिक्षण विस्तार संचालक डॉ. हरी मोरे उपस्थित होते.
पाटील म्हणाले, शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कौशल्याधारित शिक्षणावर भर देणार आहे. कृषी क्षेत्रातील विद्यार्थी हा कृषी उद्योजक कसा बनेल, त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील. कृषी संशोधन हा विद्यापीठाचा कणा आहे. नॅनो तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांना खतावर लागणारा खर्च कमी करून पीक उत्पादन खर्चात बचत करण्यात येईल. तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म अतिशय उपयुक्त आहे. त्याद्वारे तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर राहील. जिल्हा व तालुका पातळीवर शेतकरी सन्मान कक्ष स्थापन करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर उपाय देण्याचा प्रयत्न राहील.
कुलसचिव मोहन वाघ यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद सोळंके यांनी केले. कार्यक्रमाला नियंत्रक विजय कोते, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके उपस्थित होते.
(०२प्रशांत पाटील)