मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : धर्मादाय रूग्णालयांमध्ये गरीब रूग्णांना मोफत औषधोपचार मिळावेत, यासाठी राबविण्यात येत असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील चार रूग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या रूग्णालयांमधील योजनेचे कामकाज बंद करण्यात आले आहे.राज्य आरोग्य सोसायटीकडून या योजनेचे कार्यान्वयन व समन्वयन ठेवण्यात येते. सोसायटीने राज्यभरातील विविध धर्मादाय व खासगी रूग्णालयांमार्फत या योजनेची अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील आनंदऋषीजी रूग्णालय, एशियन नोबल हॉस्पिटल प्रा. लि., सिटीकेअर हॉस्पिटल, धन्वंतरी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, संगमनेरचे डॉ. इथापे हॉस्पिटल, एफ. जे. एन. एम. हॉस्पिटल अँड कम्युनिटी हेल्थ युनिट, गरूड हॉस्पिटल अँड लॅप्रोस्कोपी सेंटर, मालपाणी हॉस्पिटल, मॅक्सकेअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, नाईक पेडियाट्रिक सर्जरी सेंटर, ओम अॅक्सिडेंट अँड जनरल हॉस्पिटल, पाटील हॉस्पिटल, स्वास्थ्य हॉस्पिटल मेडिकल रिसर्च सेंटर, श्री हॉस्पिटल अॅक्सिडेंट अँड सुपरस्पेशालिटी, सुंदर नेत्रालय, शिर्डीचे साईबाबा हॉस्पिटल, विखे फाउंडेशनचे डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पिटल, लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालय, सुपायेथील ओंकार हॉस्पिटल, तांबे हॉस्पिटल, द साल्वेशन आर्मी इव्हेन्जलाईन बुथ हॉस्पिटल व आत्मा मालिक हॉस्पिटल अशा २४ रूग्णालयांच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे.राज्यभरातही मोठ्या प्रमाणात या योजनेची विविध रूग्णालयांच्या माध्यमातून अंमलबजावणी होत आहे. त्यातून गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य सेवा मिळून अनेकांना जीवदान मिळाले आहे. राज्य आरोग्य सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी अचानक तपासण्या करून राज्यभरात योजनेचा आढावा घेतला. त्यात रूग्ण व सरकारची आर्थिक लूटकरण्याचे प्रकार तसेच काही त्रुटी आढळल्यानंतर संबंधितरूग्णालयांवर कारवाई करण्यात आली आहे.तपासणीदरम्यान त्रुटी, अनियमितता आढळल्याने अहमदनगर जिल्ह्यातील आनंदऋषीजी रूग्णालय, सिटीकेअर, डॉ. इथापे व पाटील रूग्णालयांवर कारवाई करून या रूग्णालयांमधील योजनेची अंमलबजावणी थांबविली आहे. -डॉ. वसिम शेख, जिल्हा समन्वयक, महात्मा फुले जनआरोग्य योजना, अहमदनगर.तपासणीदरम्यान काही त्रुटी आढळल्याने रूग्णालयातील योजनेचे कामकाज थांबविले आहे. याबाबत संबंधितांना आवश्यक बाबींचे स्पष्टीकरण पाठविले आहे. त्यानुसार योजना पुन्हा सुरू होण्याची आम्हाला प्रतीक्षा आहे.- डॉ. प्रकाश कांकरिया,संचालक, आनंदऋषीजी रूग्णालय, अहमदनगर.
महात्मा फुले आरोग्य योजना : नगर जिल्ह्यातील चार रूग्णालयांवर कारवाई
By मिलिंदकुमार साळवे | Published: October 31, 2018 10:55 AM