कोपरगाव : कोरोना रुग्णांकडून खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांमुळे रुग्ण व नातेवाइकांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांचा महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
कोरोना संसर्गामुळे सर्वाधिक आर्थिक फटका हा सर्वसामान्य कुटुंबातील नागरिकांना बसलेला आहे. सरकारी रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय व्यवस्था नसल्यामुळे रुग्णांना खासगी सेवेकडे वळावे लागले. त्यासाठी मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली. अनेकांनी कुटुंबातील महिलांचे दागिने मोडून किंवा गहाण ठेवून उपचार घेतले. नातेवाईक व मित्र मंडळीकडून उसनवारीने पैसे घेतले. विशेषत: ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी व मजुरांवर याचा वाईट परिणाम झाला. पैशांअभावी उपचार न मिळाल्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागले, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.
गेल्या एक ते दीड वर्षापासून लॉकडाऊनमुळे लोकांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. खासगी रुग्णालये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांची पिळवणूक होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.
----------