श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शेतकऱ्याने एक वर्षापूर्वी महाऊर्जाकडे सोलर पंपासाठी अर्ज करूनही त्याला युनिट मिळाले नाही. आज-उद्या मिळेल या प्रतीक्षेतील शेतकऱ्याला त्याच्या नावावरील युनिट तिसऱ्याच व्यक्तीच्या शेतात बसविल्याचे समजले. आयकॉन नावाच्या एजन्सीच्या कर्मचाऱ्याने ही चोरी केल्याचे सांगत महाऊर्जाने गुन्हा नोंदवत सारवासारव केली. अहमदनगर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची अशीच फसवणूक झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथील कडूबाई हरिचंद्र सोलट यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये महाऊर्जाकडे सोलर पंपासाठी अर्ज केला होता. पाच एचपीच्या पंपासाठी सोलट यांनी दहा टक्के स्व-हिश्शाचे २७ हजार रुपये महाऊर्जाकडे ऑनलाइन जमा केले. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यात शेतात पंप जोडला जाईल, असा त्यांना विश्वास होता. माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी नाशिक येथील महाऊर्जाच्या अधिकाऱ्यांशी या प्रकरणी संपर्क साधला. मात्र, त्यांना याबाबत समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
अर्ज एकाचा, लाभ तिसऱ्यालातब्बल वर्ष सरले तरीही पंप शेतात दाखल झाला नाही. त्यामुळे सोलट यांनी महाऊर्जाकडे चौकशी केली. नगर व नाशिक येथील कार्यालयात धाव घेतली. आपल्या नावावर मंजूर झालेले युनिट तिसऱ्यात लाभार्थ्याच्या शेतात बसविले गेल्याचे उघड झाले. डमी शेतकऱ्याचा आणि त्याच्या शेताचा फोटो काढण्यात आला होता. तो संकेतस्थळावर अपलोड केला गेला. कडूबाई यांच्याऐवजी पुरुषाचा फोटो जोडण्यात आला. नाशिक येथे महाऊर्जाच्या कार्यालयात गेल्यानंतर तेथील अधिकाऱ्यांनी फोटो दाखविले, असे सोलट म्हणाले.
नगर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी सोलर पंपासाठी अनेकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत. स्व-हिश्शाचे पैसेही जमा केले आहेत. दोन वर्षांत फक्त जिल्ह्यात दोन हजार शेतकऱ्यांच्याच शेतात सौरपंप बसविले आहेत. मात्र, अद्यापही अनेकजण प्रतीक्षेत आहेत. अनेकांची फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त होतो आहे. याबाबत अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून शेतकऱ्यांना न्याय देऊ.-आमदार लहू कानडे, श्रीरामपूर
कंपनी म्हणते, कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल केला
महाऊर्जाने आयकॉन नावाच्या कंपनीला पंप बसविण्याचे कंत्राट दिले आहे. त्यांच्या एका कर्मचाऱ्याने परस्पर हे कृत्य केल्याचे महाऊर्जाचे अधिकारी अण्णासाहेब ठाणगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अभिजित मगरे असे कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यावर नगर येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गत आठवड्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घडलेला प्रकार हा चुकीचा आहे. आयकॉन कंपनीने त्यांच्या स्वखर्चातून सोलट यांना तीन दिवसांच्या आत पंप बसवून द्यावा, अन्यथा त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे ठाणगे म्हणाले.