लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेची होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीला राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित सामोरे जातील. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पक्की आहे, असे संकेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा पुढचा टप्पा सुरू करण्यात आला. मतदारांची यादी अंतिम करण्यात आली आहे. यानंतरचा टप्पा प्रत्यक्ष मतदानाचा असणार आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना, हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत. जिल्हा बँकेतही हे तिन्ही पक्ष एकत्र येणार का, याबाबत वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. निवडणुकीच्या चर्चेला तोंड फुटले असतानाच राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडीचे संकेत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे यशवंतराव भांगरे यांच्या पुण्यतिथिनिमित्त येत्या २४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमासाठी भंडारदरा येथे येणार आहेत. यावेळी बँकेच्या निवडणुकीबाबत चर्चा होईल, तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील हेही संगमनेर दौऱ्यावर येणार आहेत. राष्ट्रवादीचे हे दोन्ही नेते नगर जिल्ह्यात येत असून, त्यांच्या उपस्थितीत बँकेत महाविकास आघाडीच मोट बांधली जाण्याची दाट शक्यता आहे.
जिल्हा बँकेसाठी १४ मतदारसंघ आहेत. तालुक्यातून एका जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. जिल्हा बँकेत विखे व थोरात यांच्यातच सुप्त संघर्ष असतो. हा संघर्ष यावेळी उघडपणे पाहायला मिळेल. माजी मंत्री तथा आमदार राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आहेत. त्यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे हे नगर दक्षिणचे खासदार आहेत. बँकेच्या निवडणुकीत विखे पिता-पुत्रांसह माजी मंत्री मधुकरराव पिचड, शिवाजीराव कर्डिले, बबनराव पाचपुते, हे दिग्गज नेते बँकेच्या निवडणुकीत एकत्र येतील. त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे तिन्ही मंत्री व आमदार आपापल्या तालुक्यात आघाडीच्या उमेदवारांमागे ताकद उभी करतील. अकोले तालुक्यातून पिचडांविरोधात उमेदवार निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. श्रीगोंद्यातही माजी आमदार राहुल जगताप हे सक्रिय झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीतील ज्या पक्षाची तालुक्यात ताकद आहे, तिथे त्याच पक्षाचा उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे उमेदवारी देताना महाविकास आघाडीला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
...
आजी- माजी मंत्र्यांचा लागणार कस
जिल्हा बँकेतील सत्तेपासून विखे यांना बाजूला ठेवण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्ह्यातील महाविकास आघाडीला ताकद देतील, असा एक मतप्रवाह आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड व बबनराव पाचपुते हे दोन्ही नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे विखे, पिचड, पाचपुते या नेत्यांना राेखण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडीसमोर आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांचा चांगलाच कस लागणार आहे.