टाकळीमानूर : पाथर्डी तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींपैकी ३६ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीने वर्चस्व मिळविले आहे. त्यातून ग्रामीण जनतेचा महाविकास आघाडीवरील विश्वासच अधोरेखित होतो, अशी माहिती श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. प्रताप ढाकणे यांनी दिली.ढाकणे म्हणाले, ७८ ग्रामपंचायतींचा निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर तीन बिनविरोध पार पडल्या होत्या. स्थानिक पातळीवरील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयमी व लक्षवेधी प्रचार करून जनतेच्या मनात स्थान प्राप्त केले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारची शेतकरी हिताची धोरणे तालुक्यात जनतेला पटल्याने त्यांनी अनेक गावांमध्ये सत्तांतर घडवून आणले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने जनतेच्या हितासाठी कुठलीही कसर ठेवली नाही. विशेषतः शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना मोठा आधार देण्याचे काम सरकारने केले आहे. तालुक्यातील भाजप नेतृत्वाने मागील सव्वा वर्षापासून तालुक्यातील विकासाच्याबाबतीत कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने लोकांचा रोष त्यांना पत्करावा लागल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे, असेही ढाकणे यांनी सांगितले.
पाथर्डीच्या ३६ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:20 AM