श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीतील रोमहर्षक लढतीत महाविकास आघाडीने सर्वाधिक गाआघाडी मारली आहे. मात्र मोठ्या ग्रामपंचायतींवर भाजपाने वर्चस्व मिळविले आहे. अनेक गावात सत्तेला चिकटून बसणाऱ्या बड्या धेंडांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविला आहे. त्यामुळे आगामी काळात सर्वच नेत्यांना जागे रहो... असा संदेश दिला आहे.
वांगदरी ग्रामपंचायतीवर नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी वर्चस्व कायम ठेवले. भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांचा आदेश नागवडे यांनी पराभव करून विजयी एन्ट्री केली. आढळगाव, लिंपणगावमध्ये पाचपुते गटाने दहा जागा जिंकून नागवडे गटाला रोखले. हिंगणीत जिल्हा परिषद सदस्या कोमल वाखारे गटाचा दारुण पराभव झाला आहे. येळपणेत माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर, राजवर्धन वीर पिता-पुत्रांच्या पाठीला माती लावली आहे. सतीश धावडे यांनी कुरघोड्याचा राजकारणाचा वचपा काढला आहे.
राजापूरमध्ये सभापती पती शंकर पाडळे विजयी झाले; मात्र राजापूरची सत्ता भाजपकडे कायम राहिली. आढळगावमध्ये पत्रकार उत्तम राऊत गटाने सहा जाग जिंकून वर्चस्व राखले. शिवप्रसाद उबाळे यांनी अनिल ठवाळ यांचे सुपुत्र श्रीकांत ठवाळ यांना दुसऱ्यांदा धूळ चारली आहे. राष्ट्रवादीचे नेते घनश्याम शेलार यांनी वडाळीचा गड कायम राखला आहे. भानगावमध्ये आबासाहेब शितोळे यांनी सत्ता वर्चस्व कायम ठेवले.
बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी शेडगाववर वर्चस्व ठेवत आढळगाव, घोडेगाव, खांडगाव, हंगेवाडी, कोथूळ, ढोरजा, शिरसगाव बोडखामध्ये आपली फौज घुसवली आहे.
येळपणे गटात राष्ट्रवादी काँग्रेसची लहर दिसत आहे. यामध्ये माजी आमदार राहुल जगताप, अतुल लोखंडे यांचे नियोजन यशस्वी ठरले आहे. म्हातारपिंप्री बापुराव नागवडे बिनविरोधच्या डावपेच वर्चस्व मिळविले. गव्हाणेवाडी अजनुज येथील सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या आहेत.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची सेमी फायनल असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा कौल महाविकासाला उभारी आणि भाजपाला चिंतन करणारा देणारा आहे.