विधानसभा निवडणूक विश्लेषण-सुधीर लंके । अहमदनगर : बारा शून्यचा नारा देत निघालेल्या भाजपचे मतदारांनी नगर जिल्ह्यात बारा वाजविले. कॉंग्रेस आघाडीला नव्हे तर सेनेला जनतेने शून्यावर आणले. दोन्ही कॉंग्रेस सोडून भाजपत गेलेले राधाकृष्ण विखे व मधुकर पिचड हे दिग्गज नेते युतीला वाचवू शकले नाहीत. शरद पवार नावाचा करिष्मा मतदानातून दिसला. ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हा नारा जिल्ह्याने दिला आहे. नगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन्ही जागा युतीकडे आहेत. त्यातच विखे- पिचड यांना भाजपत आणल्याने त्यांचे नेते हवेत होते. पालकमंत्री राम शिंदे हेही अत्यंत बिनधास्त होते. मोदी लाट आपणाला तारणार व आपण आयते निवडून येणार हा युतीच्या बहुतांश नेत्यांचा अविर्भाव होता. भाजपचे तिकिट घ्या अन् हमखास विजयी व्हा हा जणू फॉर्म्युलाच झाला होता. हे सगळे अंदाज मतदारांनी मोडीत काढले. शरद पवारांवर ईडीने कारवाई केल्याने पवार संतापले. त्यानंतर पायाला भिंगरी लावून त्यांनी महाराष्ट्र पिंजला. नगर जिल्ह्यातही त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार असलेल्या सर्व मतदारसंघात सभा घेतल्या. सभास्थळ छोटे असो वा मोठे. पवार तेथे गेले. काहीही डामडौल न करता फिरले. पवारांनी केलेल्या या पेरणीला चांगले पीक आल्याचे निकालातून दिसले. राष्ट्रवादीने आठ जागांवर निवडणूक लढवली होती. नेवासा येथे उमेदवार न देता शेतकरी क्रांतीकारी पक्षाचे शंकरराव गडाख यांना पक्षाने पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीचे सहा उमेदवार निवडून आले. गडाख राष्ट्रवादीसोबत राहिल्यास ही संख्या सात वर जाते. कॉंग्रेसने त्यांच्या कोट्यातील संगमनेर, शिर्डी व श्रीरामपूर या तीन जागा लढविल्या. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर व श्रीरामपूर मतदारसंघ प्रतिष्ठेचे केले होते. ते त्यांनी जिंकले. म्हणजे आघाडी एकूण नऊ जागांवर पोहोचली आहे. शिर्डीत कॉंग्रेसने फारशी ताकदच लावली नव्हती. अन्यथा तेथेही विखेंची अडचण वाढली असती. श्रीरामपूरमध्ये कॉंग्रेसकडून लहू कानडे विजयी झाल्याने एक साहित्यिक व विचारी चेहरा कॉंग्रेसला मिळाला आहे. राधाकृष्ण विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी तेथे सेनेच्या भाऊसाहेब कांबळे यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. हे नेते सोबत आल्याने कांबळे हेही पुन्हा आमदार झाल्यागत वावरत होते. मात्र मतदारांनी कांबळे यांना पराभूत करुन कांबळे व विखे या दोघांनाही धक्का दिला. अकोल्यात १९८० पासून मधुकर पिचड यांचे पर्व होते. पिचड हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. अनेक वर्षे सत्तेत लाल दिवा घेऊन फिरत होते. गतवेळी त्यांचे पूत्र वैभव पिचड हेही राष्ट्रवादीकडून आमदार झाले. सकाळ-संध्याकाळ पुरोगामीपणाचा राग आळवणारे पिचड हेही निवडणुकीच्या तोंडावर पवारांना सोडून भाजपवासी झाले. पण, पिचडांचे हे पक्षांतर अकोलेकरांना आवडले नाही हे निकालातून स्पष्ट झाले. पिचड यांनी एकप्रकारे पायावर धोंडा पाडून घेतला. कर्जत-जामखेड मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांची लढत रोहित पवार यांच्याशी होती. ‘बारामतीचे पार्सल परत पाठवू’ असा नारा शिंदे, खासदार सुजय विखे यांसह मुख्यमंत्र्यांनीही दिला होता. परंतु रोहित पवार यांनी अगदी तळागाळात जाऊन बांधणी केली होती. ती राम शिंदे यांच्या लक्षातच आली नाही. मंत्रिपदामुळे शिंदे यांचा कार्यकर्ते व सामान्य लोकांशी संपर्क तुटला. त्याचा फटका त्यांना बसला. शिवाजी कर्डिले, विजय औटी हे दिग्गजही पराभूत झाले. कर्डिले १९९५ पासून आमदार आहेत. राजकीय वर्तुळात त्यांचे मोठे प्रस्थ होते. ते प्रथमच पराभूत झाले. राहुरीतून बंडखोरी न झाल्याने ती मते प्राजक्त तनपुरे यांच्या पाठिशी एकवटली. तसेच शिवसैनिकांची नाराजी कर्डिले यांना भोवली. पारनेरचे आमदार विजय औटी विधानसभेचे उपाध्यक्ष होते. औटी यांच्या संवाद तंत्राबाबत जनतेचा आक्षेप होता. शिवसैनिकही नाराज होते. त्याऊलट निलेश लंके यांनी अगदी लहान मुलांपासून सर्वांना मित्र केले होते. त्या जोरावर त्यांनी औटी यांना दणका दिला. नगर शहरात संग्राम जगताप यांनी करिष्मा दाखविला. लोकांना भयमुक्तीचे गाजर दाखविले, जगतापांवर गुन्हेगारीचे आरोप केले की निवडणुका जिंकता येतात हा नगर शहराच्या शिवसेनेचा भ्रम झाला आहे. राठोड यांच्या पराभवाने तो भ्रमाचा भोपळा फुटला. शेवगाव-पाथर्डीत काटे की टक्कर झाली. तेथे पंकजा मुंडे फॅक्टर मोनिका राजळे यांच्यासाठी जमेचा ठरला. तेथे राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे यांना मिळालेली मतेही दुर्लक्षित करता येणारी नाहीत. नेवाशात बाळासाहेब मुरकुटे यांना गतवेळी मतदारांची सहानुभूती मिळाली होती. मात्र, यावेळी शंकरराव गडाख यांनीही पक्की बांधणी केली होती. कोपरगावात मतविभागणीचा फटका भाजपच्या आमदार स्रेहलता कोल्हे यांना बसला. तेथे आशुतोष काळे विजयी झाले. पण, मताधिक्य कमी असल्याने तेथे विरोधही कायम आहे. संगमनेर व शिर्डीचा निकाल अपेक्षित असाच आहे. तेथे विखे-थोरात यांनी एकमेकांना त्रास न देण्याचे बहुधा ठरविले होते. त्यामुळे या दोघांनीही एकमेकांच्या विरोधात आपली पूर्ण ताकद लावलेली दिसली नाही. जिल्ह्यात पुन्हा विखे-पवार संघर्षरोहित पवार यांना नगर जिल्ह्याच्या राजकारणात उदय झाल्याने विखे पिता-पुत्रांसमोर आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. सुजय विखे यांच्यासाठी नगर लोकसभा मतदारसंघाची जागा न सोडल्याने विखे हे पवारांवर नारज होते. त्यातून पवार-विखे यांची एकमेकावर टिकाटिपण्णी सुरु झाली. विधानसभेलाही सुजय विखे यांनी पवारांविरोधात आक्रमक प्रचार केला. दोन्ही आघाडीला शून्यावर आणण्याचा विडा त्यांनी उचलला होता. मात्र तो फसला. आता रोहित पवार विजयी झाल्याने ते जिल्ह्याच्या राजकारणात लक्ष घालतील हे उघड आहे. त्यातून हा संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. सत्ता कुणाची, मंत्रिपदे कुणाला? राज्यात भाजप-सेना युतीची सत्ता येणार की सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस असे समीकरण जुळणार याची प्रतीक्षा आहे. सेना-भाजपची सत्ता आल्यास राधाकृष्ण विखे, मोनिका राजळे, बबनराव पाचपुते हे मंत्रिपदाचे दावेदार राहतील. दोन्ही कॉंग्रेस सत्तेत सहभागी झाल्यास बाळासाहेब थोरात, रोहित पवार हे मंत्रिपदाचे दावेदार होतील.
महायुतीचे वाजले बारा, ‘राष्ट्रवादी’ पुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 3:04 PM