श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरातील जय श्रीराम प्रतिष्ठानच्या नवरात्रोत्सव मंडळाची घटनस्थापना पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. येथे महेश्वरानंदगिरीजी महाराजांनी त्यांच्या छातीवर घटनास्थापना करत नऊ दिवस अन्नत्याग केला आहे.
शहरातील मुख्य रस्त्यावर प्रतिष्ठानने भव्य देखावा उभा केला आहे. सूर्य मंदिराचा हा देखावा भाविकांचे आकर्षण ठरला आहे. स्वामी महेश्वरानंदगिरीजी हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील आहेत. हरयाणाचे बाबा कालिदास यांचे ते शिष्य आहेत. त्यांचे आई-वडील श्रीरामपूर येथे आहेत. ते राज्यभर सतत भ्रमंती करत असतात. देवीचे ते भक्त असल्यामुळे त्यांनी येथे येत चक्क छातीवर घटस्थापना केली आहे. घटस्थापनेच्या दोन दिवस अगोदरच त्यांनी अन्नत्याग केला आहे. यादरम्यान ते पाणीही पिणार नाहीत. त्यांच्या साधनेची माहिती शहरभर पसरली आहे. त्यामुळे भाविकांची गर्दी होत आहे.