बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेल्या रोहिणी संतोष जगताप या कष्टकरी रणरागिणीने पेडगाव शिवारातील एक एकर शेतीत महोगणी फुलविली आहे. पुणे येथील एका कंपनीशी महोगनी लागवड, विक्रीबाबत बारा वर्षानंतर एक कोटी रूपयांचा मोबदला देण्याचा लेखी करार तिने केला आहे.
संतोष व रोहिणी जगताप हे मोलमजुरी करणारे दाम्पत्य आहे. त्यांनी दहा वर्षापूर्वी पेडगाव शिवारात एक एकर जमीन खरेदी केली. मजुरीसह त्या शेतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान अॅग्री कंपनीचे गणेश हराळ यांनी त्यांना या शेतबाबत माहिती दिली. त्यानंतर हराळ यांनीच रोहिणी जगताप यांना गेल्या वर्षी ५२ हजारांची मोहगणीची ५०० रोपे दिली. त्यांची एक एकर शेतीत लागवड केली. बारा वर्षात एक कोटी रूपयांचे उत्पन्न मिळेल याची लेखी हमी दिली. तसे हमीपत्र त्यांनी दिले आहे. एका वर्षात ही झाडे सात ते आठ फूट वाढली आहेत.
महोगणी आफ्रिका, दक्षिण अमेरिका खंडास भारतातील काझीरंगा, कोकण परिसरातही आढळतात. झाडाच्या लाकडाचा उपयोग प्लायवूड, पॅनल बॉक्स, जहाज, घरे बांधणीसाठी केला जातो. बारा वर्षानंतर या झाडाची उंची ३० ते ४५ फुटापर्यंत होते. त्यानंतर ते कापले जाते. त्यांनी करार पद्धतीने केलेली मोहगनी शेती पाहून तालुक्यातील अनेक शेतकरी याकडे वळले आहेत. मात्र खासगी अॅग्रो कंपन्यांशी करार करताना शेतक-यांनी थोडीशी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. अन्यथा, बारा वर्षाचे तप वाया जाऊ शकते, त्यामुळे खबरदारी घ्यावी, असे जगताप यांनी म्हटले आहे. असे प्रकार अगोदर निलगिरी, कोरपडबाबत घडले आहेत.
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत क्रांतीज्योत लोकसंचलित साधन केंद्राच्या माध्यमातून चालणा-या श्रीगोंदा येथील जय मल्हार महिला बचत गटाने आर्थिक मदत केली. त्यामुळे मोहगणी शेती फुलविण्याचे स्वप्न साकार झाले आहे, असे जगताप यांनी सांगितले.